जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत आणि बहुजन बांधवांचा लोकदेव असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाचा सोमवती उत्सव येत्या सोमवारी (दि. १६) साजरा करण्यात येणार असून, पहाटे २ वाजता पालखी सोहळा क-हास्नानासाठी गडकोटातून प्रस्थान ठेवेल. सकाळी ७ वाजता क-हा नदीतीरी उत्सवमूर्तींना विधिवत अभिषेक स्नान घालण्यात येईल, अशी माहिती प्रमुख मानकरी इनामदार पेशवे यांनी दिली.सोमवती उत्सव नियोजनासाठी समस्त खांदेकरी-मानकरी, ग्रामस्थ मंडळाची बैठक मंगळवारी (दि. १०) मल्हार गौतमेश्वर मंदिराच्या प्रांगणात पार पडली. या वेळी मंडळाचे अध्यक्ष गणेश आगलावे, प्रमुख वतनदार इनामदार राजेंद्र पेशवे, सचिन पेशवे, वेदमूर्ती शशिकांत सेवेकरी, राजेंद्र चौधरी, पंडित हरपळे, सुशील राऊत, आबा राऊत, बबनराव बयास, अप्पा बारभाई, तानाजी पानसरे, दिलावर मनेर, संतोष खोमणे, अमोल शिंदे, नामदेव जगताप, कृष्णा कुदळे, जालिंदर खोमणे, गणेश झगडे, देविदास कुंभार, दिलीप मोरे, सुरेंद्र नवगिरे, पोलीस उपनिरीक्षक राजेश माळेगावे, देवसंस्थान विश्वस्त संदीप जगताप, शिवराज झगडे, माजी विश्वस्त नितीन राऊत, व्यवस्थापक दत्तात्रय दिवेकर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.सोमवारी सकाळी ७.२७ पर्यंत अमावास्या असल्याने उत्सवमूर्तींना कºहास्नान घालण्यात येणार असून, सकाळी १० पर्यंत पालखी सोहळा गडकोटामध्ये दाखल होईल. रोजमुरा (तृणधान्य) वाटप झाल्यानंतर उत्सवाची सांगता होईल. तसेच, सोमवारीच प्रतिपदा असल्याने मुख्य मंदिरातील ‘पाकाळणी’ विधी दुपारी १२ च्या पूर्वी करण्यात येणार असल्याची माहिती इनामदार पेशवे यांनी दिली.मुख्य मंदिरातील स्वयंभू लिंगावरील त्रिकाल पूजेव्यतिरिक्त पाद्यपूजा बंद करण्यात आलेल्या आहेत. यामुळे गावाच्या अर्थकारणावर परिणाम झाला आहे, तसेच राज्याच्या विविध प्रांतांतून येणाऱ्या भाविकांची पाद्यपूजा सुरू करण्याची मागणी असल्याने धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून पाद्यपूजा करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली.देवसंस्थानाच्या वतीने पालखीमार्गाची साफसफाई करण्यात येणार असून, रंभाई शिंपीण कट्ट्यावर विद्युतरोषणाई करण्यात येईल. खांदेकºयांसाठी अल्पोपाहार व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
सोमवती यात्रा; पहाटे पालखी सोहळा रंगणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 12:23 AM