महुडे (पुणे) : मुलीला आत्ताच माझ्यासोबत नांदायला पाठवा, नाहीतर तुम्ही चला, अशी अर्वाच्य भाषा वापरून सासूचाच हात धरणाऱ्या जावयाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास भोर तालुक्यातील एका गावात घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राहुल (नाव बदलले आहे) याचे वैशाली (नाव बदलले आहे) हिच्याशी काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. दोघांना दोन मुलेही आहेत. काही गोष्टींवरून कुरबूर होत होती. नुकतेच नवरा-बायकोचे भांडण झाल्यानंतर बायको माहेरी निघून गेली होती. काही दिवसांनी नवरा तिला नेण्यासाठी सासरवाडीत पोचला त्याने वैशालीला परत पाठवा, असे सासुबाईला सांगितले. मात्र पोरं लहान आहेत व बाहेर पाऊस आहे, आज राहा व दोघेही उद्या मुलाबाळांसह जा, असे सांगितले. मात्र त्यावर जावयाने पोरीला पाठवणार नसाल तर तुम्हीच चला, अशा अर्वाच्य भाषेत सासुबाईचाच विनयभंग केला.
त्यावरून सासरे आणि इतरांनी जावयाला समज दिली, त्यातून वाद झाला व हाणामारी झाली. त्यानंतर सासुबाईंनीच जावयाविरुद्ध तक्रार दिली. याबाबत पोलिसांनी जावयाला अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधीशांनी त्याची रवानगी येरवाडा कारागृहात केली आहे.