पुणे : शिवसंग्राम संघटनेचे दिवंगत अध्यक्ष विनायक मेटे यांची विमाननगर भागातील सदनिका बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मेटे यांचा मुलगा आशुतोष विनायक मेटे (वय २०, रा. कोरेगाव पार्क) याने विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, त्यानुसार मेटे यांची बहीण आणि त्यांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
आशुतोष याने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्याची आत्या सत्यशीला महादेव जाधव आणि त्यांचा मुलगा आकाश (दोघेही रा. पंचगंगा सोसायटी, ठाणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. सदनिकेची कागदपत्रे मेटे यांच्या पत्नीच्या नावावर होती. जाधव यांनी सदनिकेचे कुलूप तोडून बेकायदा ताबा घेण्याचा प्रयत्न केला, अशी फिर्याद आशुतोष याने दिली आहे.
विनायक मेटे यांचा मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघाती मृत्यू झाला होता. मेटे यांनी मृत्यूपूर्वी विमाननगर भागातील गंगापुरम सोसायटीत सदनिका खरेदी केली होती. मेटे यांनी सदनिका बहीण सत्यशीला आणि भाचा आकाश यांना भेट दिली होती, असा दावा जाधव यांच्याकडून करण्यात आला आहे.