लोणी काळभोर : पत्नीवर वाईट नजर ठेवल्याच्या संशयावरून मुलाने बापावर लोखंडी कोयत्याने सपासप वार करून खून केल्याची घटना घडली होती. ही घटना शिंदवणे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील शिवारात सन २०१४ साली घडली होती. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी असलेल्या मुलाला न्यायालयाने जन्मठेपसह २५ हजार रुपये दंडाची शिक्षा शनिवारी (दि. ०१) सुनावली आहे. पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी.पी. जाधव यांनी हे आदेश दिले आहेत.सचिन अंबादास खोत (वय-२७, रा. उरुळी कांचन इरीगेशन कॉलनी जवळ मुळ गाव केवड ता माढा जि सोलापूर) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर अंबादास दिगंबर खोत (वय-५२) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक अजिनाथ जगन्नाथ शिंदे (वय ४२) यांनी सरकारच्या वतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबादास खोत हे शिंदवणे ग्रामपंचायत हद्दीतील गट नं ३८० मध्ये काम करीत होते.तेव्हा आरोपी सचिन हा त्यांना जेवणाचा डबा देण्यासाठी गेला होता. तेव्हा सचिन याने त्याच्या पत्नीशी वाईट नजरेने बघता. असा प्रश्न वडील अंबादास खोत यांना केला. यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली. तेव्हा सचिन याने ऊस तोडण्याचा कोयता हातात घेऊन वडिलांच्या मानेवर व गळ्यावर सपासप वार केले. या मारहाणीत अंबादास खोत यांचा जागीच मृत्यू झाला होता. खून केल्यानंतर आरोपी सचिन खोत हा स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला होता. व त्याने खुनाची कबुली पोलिसांना दिली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली होती.सदर गुन्ह्याचा खटला हा पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात सुरु होता.या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने वकील नामदेव तरळगटटी यांनी कामकाज पहिले. या खटल्यात अॅड. तरळगटटी यांनी केलेले युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी सचिन खोत याला जन्मठेप व २५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने सक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे. हे आदेश न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी दिले आहेत.दरम्यान, पुणे शहर पोलिस उपायुक्त राजकुमार शिंदे, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र भाऊराव पन्हाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजितसिंग परदेशी व महिला पोलीस हवालदार ललिता सिताराम कानवडे यांची या खटल्यात सरकारी वकील अॅड. नामदेव तरळगटटी यांना बहुमुल्य मदत मिळाली.
वडिलांचा खून करणाऱ्या मुलास जन्मठेपेची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 13:56 IST