पुणे : नाट्यरूपांतरणातून मोलकरीण ते शिक्षणमंत्री असा प्रवास, शास्त्रीय नृत्यातून उलगडणारी ‘ती’ची विविध रूपे, गाण्यांमधून मांडले जाणारे स्त्रीच्या आयुष्यातील टप्पे, लग्नसंस्थेबद्दलच्या दृष्टिकोनाबाबत चर्चा अशा विविधांगी सादरीकरणातून यंदाचा महिला दिन ‘ती’ला समर्पित केला जाणार आहे. ‘लोकमत’ आणि ‘इव्हेंटिस्ट्री मॅनेजमेंट’ यांच्या संयुक्त विद्यमाने अनोखा कलाविष्कार सादर होणार आहे. डॉ. विजया वाड यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेल्या ‘सोंगटी’ या कादंबरीचे योगेश सोमण यांनी नाट्यरूपांतरण केले आहे. नूपुर दैठणकर हिचा नृत्याविष्कार, स्वामिनी कुलकर्णींचे गायन आणि गौरी कानिटकर यांच्याशी वैचारिक संवाद अशी मेजवानीही यानिमित्ताने लुटता येईल. येत्या बुधवारी (दि. ८) बालगंधर्व रंगमंदिरात रात्री ९ वाजता ही मैफल अनुभवायला मिळेल. योगिनी पोफळे सूत्रसंचालन करणार आहेत. हा कार्यक्रम विनामूल्य असून, लोकमत सखी मंचच्या सदस्यांना विशेष निमंत्रण आहे. माधवी सोमण, अंजली धारूंच्या मुख्य भूमिकामोलकरीण ते शिक्षणमंत्री असा एका मुलीचा ज्वलंत प्रवास करून महिलांना स्फूर्ती देणारी ‘सोंगटी’ साहित्यिक मूल्यांमुळे कायमची मनावर कोरली जाते. योगेश सोमण यांचे लेखन आणि दिग्दर्शन असलेल्या या नाट्यरूपांतरणामध्ये शिक्षणाचे महत्त्व, राजकारणात महिलांसमोर उभ्या राहणाऱ्या अडचणी, अडचणींवर मात करत मुलीने जिद्दीने केलेला प्रवास अनुभवता येणार आहे. माधवी सोमण आणि अंजली धारू या दीर्घांकामध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहेत. नूपुर दैठणकरांच्या नृत्याविष्कारातून स्त्रीभ्रूणहत्येला वाचानृत्यांगना नूपुर दैठणकर हिच्या नयनमनोहारी नृत्याविष्काराचा आनंद लुटता येईल. स्वाती दैठणकर यांची कविता आणि धनंजय दैठणकर यांची संतूरवादनातील रचना अशा मिलाफातून भरतनाट्यातून स्त्रीभ्रूणहत्येसारख्या महत्त्वाच्या विषयावर प्रकाश टाकण्यात येणार आहे. ‘घेऊ दे मोकळा श्वास मला, पाहू दे मोकळे आकाश कधी, बाकी काही नको माते, जगण्याची दे ना एक संधी’ अशा ओळींमधून आईला आर्ततेने साद घालणारी चिमुरडी भरतनाट्यमची मूल्ये वापरून नृत्याविष्कारातून उभी करण्याचा प्रयत्न असल्याचे नूपुर दैठणकर यांनी सांगितले.स्वामिनी कुलकर्णी गुंफणार स्त्रीत्वाचा प्रवासमहिलांचा बालपणापासून ते वृद्धत्वापर्यंतचा प्रवास, मालिकांची शीर्षकगीते आणि चित्रपटांमधील गाणी यातून सर्जनशीलतेने गुंफण्यात आला आहे. स्वामिनी कुलकर्णी यांच्या गायनातून हा प्रवास अधोरेखित होणार आहे.गौरी कानिटकर साधणार लग्नसंस्थेवर संवादअनुरूप विवाह संस्थेच्या गौैरी कानिटकर तरुणींचा लग्नसंस्थेकडे पाहण्याचा दृष्टिकोन, मुलींच्या अपेक्षा याबाबत संवाद साधणार आहेत. ज्ञानेश्वर गायकवाड हे कानिटकर यांच्याशी संवाद साधणार आहेत.
नाट्याविष्कारातून उलगडणार ‘सोंगटी’
By admin | Published: March 05, 2017 4:35 AM