पिरंगुट - मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने वडिलांनीही आपले प्राण सोडले. मुलाच्या तेराव्याच्या दिवशी वडिलांची प्राणज्योत मालवली. अतिशय हृदय पिळवून टाकणारी ही घटना पिरंगुट येथे घडली. अंकुश बाबूराव नवाळे असे मृत झालेल्या वडिलांचे नाव आहे.पिरंगुट (ता. मुळशी) येथील हिराजनगर येथे हे अंकुश नवाळे यांचे कुटुंबीय राहत आहे. मुलगा, पत्नी, सून व नातवंडासह ते येथे राहत आहे. शनिवारी (दि. १४) अंकुश नवाळे यांचा एकुलता एक मुलगा अजित याचे ३०व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.आपला एकुलता एकमुलगा गमावल्याने अंकुश नवाळे हे मानसिक ताण तणावाखाली होते. दरम्यानच्या काळात ते आजारी होते. त्यांचा मुलगा अजित याचा गुरुवारी (दि.२६) तेरावा विधी होता. याच दिवशी सकाळी अंकुश नवाळे यांचे निधन झाले.घरातील कर्ते असलेल्या नवाळे परिवारातील पिता-पुत्राच्या एकापाठोपाठ जाण्याने या परिसरावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अतिशय हृदय पिळून टाकणारी घटना सर्वांना हेलावून गेली. समाजातून दु:ख व्यक्त केले जात आहे.
मुलाचा मृत्यू; वडिलांनीही सोडले प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2018 4:16 AM