'तिथं मला डाऊट होताच...' , राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातील पराभवावर अजित पवारांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 04:01 PM2022-01-04T16:01:23+5:302022-01-04T16:01:51+5:30
पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत चर्चेचा विषय ठरलेल्या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपने सणसणाटी विजयाची नोंद केली आहे
पुणे : पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत चर्चेचा विषय ठरलेल्या राष्ट्रवादीच्या बाल्लेकिल्यात भाजपने सणसणाटी विजयाची नोंद केली आहे. 'क' वर्ग सहकारी बॅका व पतसंस्था गटात भाजपचे उमेदवार प्रदिप कंद यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार सुरेश घुले यांचा १४ मतांनी पराभव केला आहे. जिल्हा बँकेच्या कार्यकिर्दीत प्रथमच विरोधी उमेदवाराने राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवाराचा पाडाव करीत पुणे जिल्हा बँकेत प्रवेश केल्याचा इतिहास घडला आहे.
यावरच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या पराभवानंतर पुण्यात प्रतिक्रिया दिली आहे.
''बारामतीत भाजपचा प्रदीप कंद निवडून आला आहे. मला तिथं डाउट होताच पण त्या एका ठिकाणी आम्ही का कमी पडलो याची बारकाईने माहिती घेणार आहे. नक्की काय गडबड झाली हे पाहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.''
पवार म्हणाले, सातपैकी सहा जागांवर राष्ट्रवादीचा विजय झाला. एका जागेवर राष्ट्रवादीचा पराभव झाला असून भाजपचा विजय झाला आहे. हा पराभव जिव्हारी लागला असून एका जागेचं वाईट वाटतंय. या जागेबाबत मला डाऊट होताच. तिथे 11 मते कमी पडली. पण बारामतीत आम्हाला चांगला लीड मिळाला आहे.
राष्ट्रवादी कॉंगेसच्या सुनील चांदेरे 28 मते
''पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 21 जागांपैकी 14 जागा बिनविरोध झाल्या, तर 7 जागासाठी आज सकाळी मतमोजणी सुरू झाली. यामध्ये मुळशी तालुका मतदारसंघातून बँकेचे माजी अध्यक्ष आत्माराम कलाटे यांना धक्का देत राष्ट्रवादी कॉंगेसच्या सुनील चांदेरे 28 मते घेत भरघोस मतांनी विजयी झाले असल्याचे पवारांनी यावेळी सांगितले आहे.''
इतर तालुक्यात राष्ट्रवादीला भरगोस मते
''एक ठिकाणी जरी पराभव झालातरीही .तरी अन्य तालुक्यात राष्ट्रवादीच्या महिला भरगोस मतांनी निवडून आली आहेत. दौंड, पुरंदर, आंबेगाव याठिकणी सुद्धा राष्ट्रवादीने आपला झेंडा रोवला असल्याचे ते म्हणाले आहेत.''
प्रदिप कंद यांना त्यांची जागा दाखवा असे अजित पवारांनी सुनावले होते
जिल्हा बँकेच्या 'क' वर्गातून पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे नेते प्रदिप कंद यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर जिल्हात या जागेसाठी चर्चेचा विषय ठरला होता. राष्ट्रवादीने कंद यांचे आव्हान मोडीत काढण्यासाठी हवेली तालुक्यातूनच सहकारात दिग्गज नेते सुरेश घुलेंना मैदानात उतरवून त्यांचे आव्हान मोडीत काढण्याचा प्रयत्न केला होता. या लढतीची दखल राष्ट्रवादी चे जिल्ह्याचे नेते अजित पवार यांनी घेऊन राष्ट्रवादी च्या उमेदवारांच्या प्रचारात प्रदिप कंद यांच्यावर शेलक्या भाषेत टिकास्त्र सोडून प्रदिप कंद यांना त्यांची जागा दाखवा असे कडक शब्दांत सुणावले होते. परंतु मतदारांनी प्रदिप कंद यांच्या पाठिमागे ठामपणे राहत दणदणीत मतांनी विजयी केले आहे.