गेल्या अनेक वर्षांपासून मंचर येथे एसटीचे आगार सुरू करण्याची मागणी होती. त्यासाठी राज्याचे गृहमंत्री आणि आंबेगावचे लोकप्रतिनिधी दिलीप वळसे पाटील यांनी पुढाकार घेतला. सहा वर्षांपूर्वी आंबेगाव तालुक्यासाठी एसटी डेपो मंजूर करून अवसरी हद्दीत पाच एकर क्षेत्रात एसटी डेपोचे बांधकाम पूर्ण झाले. त्याला मंचर एसटी डेपो नाव देण्याचे ठरले. एसटी महामंडळाचे पुणे व मुंबई येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मंचर एसटी डेपोच्या बांधकामाची पाहणी केल्यानंतर वाहक व चालक, इलेक्ट्रिशियन सर्वच प्रशासकीय बाबींची पूर्तता झाली असून, कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर लवकरच मंचर एसटी डेपोचे उद्घाटन होईल, असे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.
मंचर येथे नारायणगाव राजगुरूनगर एसटी डेपोतून वाहक व चालकअभावी एसटी बस तासनतास उशिरा येत होत्या. त्यामुळे तालुक्यातील प्रवाशांना मंचर, पुणे, मुंबई, नाशिक, नगर येथे ये-जा करणाऱ्या तसेच मंचर येथे शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत होते. कित्येक वेळा एसटी वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांचे कॉलेज बुडत होते. अनेक वेळा सायकलचा आधार घ्यावा लागत होता. त्यामुळे आंबेगाव तालुक्यात एसटी डेपो व्हावी, अशी मागणी प्रवासी मागील ४० वर्षांपासून करत होते. या बाबत अनेक वेळा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना निवेदन देण्यात आले होते. मागणीची गरज ओळखून गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सहा वर्षांपूर्वी आंबेगाव तालुक्यासाठी एसटी डेपो मंजूर करून अवसरी हद्दीत पाच एकर क्षेत्रात एसटी डेपोचे बांधकाम पूर्ण झाले. त्याला मंचर एसटी डेपो नाव देण्याचे ठरले.
--
चौकट
राज्य परिवहन मंडळाने मंचर एसटी डेपोसाठी ५० पेक्षा जादा एसटी बस मंजूर कराव्यात. त्यापैकी पंधरा नवीन एसटी बस द्याव्यात. त्यामुळे मंचर एसटी डेपोतून मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नगर, रत्नागिरी, गाणगापूर, पंढरपूर, त्र्यंबकेश्वर, कोल्हापूर या लांबच्या एसटी बस चालू करण्यास अडचण होणार नाही. डेपामुळे प्रवाशांची सोय होणार आहे.
--
फोटो क्रमांक : मंचर एसटी बस डेपोसाठी मंजूर झालेल्या अवसरी हद्दीतील पाच एकर क्षेत्रातील मंचर एसटी डेपोचे पूर्णत्वास आलेले बांधकाम.