झोपडपट्ट्यांमध्ये चोऱ्यामाऱ्या किंवा दादागिरी करा, ही जी संस्कृती वाढली आहे. त्याचा महिलांवरील वाढत्या बलात्काराच्या घटना आणि त्यांच्या असुरक्षिततेशी जवळचा संबंध आहे. कोरोनाच्या वॉर्डमध्ये एका महिलेवर बलात्कार झाला, याला कोणती संस्कृती म्हणायची? एकीकडे जात, धर्म, संस्कृतीचा अभिमान बाळगायचा आणि दुसऱ्या बाजूला जात-धर्मांमध्ये पवित्रता हवी याकरिता प्रेमावर बंधने टाकायची. विकृत पद्धतीचे पुरुषी रचनांचे हे आविष्कार आहेत. शिक्षण, आरोग्य विनामूल्य मिळण्याबरोबरच महिलांच्या सुरक्षिततेची हमी मिळायला हवी. शाश्वत उत्पन्न नसणं म्हणजे भिकाऱ्यासारखं सरकारच्या पैशावर अवलंबून राहाणं, आता तर बेरोजगारीचा दर वाढला आहे. या सर्वांची साखळी वैफल्यग्रस्तेशी निगडित आहे. यातूनच मग मुलगी दिसली की बलात्कार करण्याचे प्रकार घडतात. या सर्व कड्या एकमेकांमध्ये जोडलेल्या आहेत. या कडा जर तोडायच्या असतील, तर आपल्याला मूलगामी मनुष्यत्वाच्या अधिकारावर काम केलं पाहिजे. बलात्काऱ्यांना कडक शिक्षा करा म्हटलं म्हणजे महिलेला न्याय देतो, असे होत नाही. महिला जिवंत राहिली तरी तिला ही घटना विसरू दिली जात नाही. न्यायालयात तिला उभी करून वारंवार प्रश्न विचारले जातात. त्यातून ती कधीच सावरू शकत नाही. तिचे पुनर्वसन होण्यासाठी ती पीडिता सांगण्यासाठी पुढे येत नाही. कारण ९५ टक्के बलात्कार हे ओळखीच्या व्यक्तींकडूनच केले जातात. महिलेच्या पाठीमागे उभे राहायला हवं. पण तसं होत नाही. आपण महिला सक्षमीकरणाच्या गप्पा मारतो. पण ५० टक्के महिलांना कोणतीही सुरक्षितता नाही, घरात सन्मान नाही. ही गुंतागुंत समाजाच्या दुरवस्थेशी जोडली गेली आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलीवर झालेला बलात्कार हा तिरस्करणीय आहे. याचा मी पूर्णपणे निषेध करते. सर्वांनीच केले पाहिजे. पण एकाच घटनेवर चर्चा होते. त्याच्या लिंक आहेत. हाथरस किंवा इतर बलात्कारांचे काय झाले? संसदेमध्येच आरोपी बसलेले आहेत. कितीतरी वेळेला राजकीय पक्षांनी बलात्काऱ्यांना पाठीशी घातले जाते. या घटना घडल्यावर महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येतो. प्रत्येकाला आत्मसन्मान मिळण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत!
--------------