बाणेर : हिंजवडी, बालेवाडी ते शिवाजीनगरदरम्यान ८ हजार ३१३ कोटी रुपये एकूण खर्चाच्या २३.२ किलोमीटर लांबीच्या मेट्रोचे काम अंतिम टप्प्यात असून एकूण ७४ टक्क्यांपेक्षा अधिक पूर्ण झाले आहे. तर आर्थिक उद्दिष्ट ६३ टक्के पूर्ण झाले आहे. मार्च २०२५ अखेर येथून मेट्रो ट्रेन धावणार आहे. त्यामुळे रोजच्या वाहतूक कोंडीने वैतागलेल्या आयटी आणि इतर कर्मचाऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार आहे.
आठ डिसेंबर २०१८ रोजी पंतप्रधानांच्या हस्ते शिवाजी नगर ते बालेवाडी, हिंजवडी मेट्रोच्या कामाचे भूमिपूजन झाले. मेट्रोचे काम कधीपर्यंत पूर्ण होईल आणि रोजच्या वाहतूक कोंडीतून कधी सुटका होईल, असा प्रश्न या भागातील स्थानिक रहिवासी, आयटियन्स आणि चाकरमान्यांना पडला आहे. बाणेर बालेवाडी हा भाग झपाट्याने वाढत आहे. हिंजवडी भागात पुण्यातील सर्वाधिक मोठे औद्योगिक आणि आयटी क्षेत्र आहे. या भागात असंख्य कर्मचारी, अधिकारीवर्ग कामानिमित्त दररोज खासगी आणि कंपन्यांच्या वाहनाने (बस, कार) ये-जा करतात. मात्र, त्यांना दररोज येथील रस्त्यांवर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. येथील कोंडीने कर्मचारी आणि स्थानिक रहिवासी अक्षरशः वैतागलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने येथील नागरिकांच्या सोयीसाठी मेट्रो सुरू करण्याचे काम सुरू आहे.
हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील पुणे मेट्रोलाइन ३ चे काम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर टाटा समूहाने हाती घेतले आहे. यासाठी पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड या स्पेशल पर्पज व्हेइकल (एसपीव्ही) कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. त्यामार्फत काम सुरू आहे. मेट्रो मार्गिकेची लांबी २३.२ किलोमीटर आहे. या मेट्रो मार्गावर एकूण ९२३ खांब उभारण्यात येत असून या मार्गिकेवर २३ स्टेशन्स (स्थानके) उभारण्यात येत आहेत. यातील बहुतांश स्थानकांची कामे पूर्ण झालेली आहेत. माण येथे १३.२ हेक्टर जागा कार डेपोसाठी भूसंपादन करण्यात आले आहे. कार डेपोचे काम प्रगतिपथावर आहे.
केंद्र सरकारच्या मेट्रो रेल धोरण २०१७ अन्वये सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर राबविण्यात येणारा देशातील हा पहिलाच प्रकल्प आहे. यासाठी केंद्राबरोबर राज्याचे २० टक्क्यांपर्यंत अर्थसाहाय्य असणार आहे. हिंजवडी-शिवाजीनगर मार्गावरील पुणे मेट्रोलाइन ३ साठी (पुणेरी मेट्रो) देखभाल दुरुस्ती, पार्किंगसाठी माण येथे डेपो उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. एकूण १३.२ हेक्टर जागेत हा सुसज्ज डेपो आकार घेत आहे.
हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यान ८ हजार ३१३ कोटी रुपये एकूण खर्चाच्या २३.२ किलोमीटर लांबीच्या मेट्रोचे काम अंतिम टप्प्यात आहे. एकूण ७४ टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण झाले आहे. मेट्रोचे काम मार्च २०२५ पर्यंत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. - रिनाज पठाण, मुख्य अभियंता, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे.