पुणे : सध्या पुणे शहरात गुरूवारी (दि.११) सकाळी पुणेकरांना उकाड्यापासून जरासा दिलासा मिळाला. कारण हवेत गारवा असल्याने उष्णतेपासून काहीसी सुटका झाली. पण दुपारी मात्र सूर्यनारायण चांगलाच आग ओकत होता. दुपारी पुणेकरांच्या अंगाची लाहीलाही झाली. किमान तापमान २० अंशाच्यावर नोंदले गेले. पण येत्या ७२ तासांमध्ये हलक्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
शहरातील किमान तापमान हे शिवाजीनगरला १९.८ तर वडगावशेरीला २६.६, मगरपट्टा येथे २६.१ आणि कोरेगाव पार्क येथे २५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कमाल तापमानही चाळशीजवळपास नोंदले जात आहे. बुधवारी शिवाजीनगरचे कमाल तापमान ३९.५ तर वडगारवशेरी, कोरेगाव पार्क येथील कमाल तापमान ४१.२ अंश सेल्सिअस नोंदले गेले.
आज गुरूवारी अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम येथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, उद्या शुक्रवारी गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी पाऊस आणि गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. तर पुण्यात पुढील ७२ तासांमध्ये हलक्या सरी कोसळतील, असा अंदाज ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिला आहे.