पुणे : अनेकदा अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात जीवितहानी होते. प्रशासनातील अनेक विभागात परस्पर समन्वय नसल्याने मदत उशीरा पोहचते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने पूरपरिस्थिती कृती आराखडा तयार केला असून प्रशासनातील सर्व विभागामध्ये समन्वय ठेवण्यासाठी आदर्श कार्यप्रणाली (एसओपी) तयार करण्यात आले आहे. या आराखड्यानुसार स्थानिक स्वराजसंस्थासह संबंधित यंत्रणांवर जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत.
पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे पुर, पुर सदृष्य परिस्थिती, स्थलांतर, नागरिकांचे मृत्यू, बाधित पशुधन, पीकांचे-जमिनीचे नुकसान, घरं, रस्ते, पूल यांची पडझड अशी मोठी जीवित तसेच वित्तहानी होत असल्याचे मागील काही वर्षांत दिसून आले आहे. अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे स्थलांतर, मदत यंत्रणा, अपुरे मनुष्यबळ यामुळे जिल्हा प्रशासनासह सर्व विभागांची एकच धावपळ उडते. त्यापार्श्वभूमीवर पुर नियंत्रण आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी मान्सून काळातील खबरदारी म्हणून हवामान विभाग, पाटबंधारे विभाग, कृषी विभाग, विद्यूत महामंडळ, आरोग्य विभाग, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), जिल्हा परिषद, पुणे-पिंपरी चिंचवड महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, पोलिस प्रशासन, महामेट्रो, भारतीय दूरसंचार निगम (बीएसएलएल) आदी विभागातील अधिकारी, पदाधिकारी, अभियंता, अधीक्षक आदींची बैठक घेऊन यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.
आपत्ती व्यवस्थापन विभागातील अधिकारी विठ्ठल बनोटे यांनी सांगितले की, आपत्तीचा सामान करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहे. पूर्व तयारीच्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे. सर्व विभागांमध्ये परस्पर समन्वय रहावा म्हणून संयुक्तीक आदर्श कार्यप्रणाली तयार करण्यात आली आहे.
२३ गावांना दरडीचा धोका
प्रशासनाने जिल्हातील दरड प्रवण गावांची नावे जाहीर केली आहेत. त्यामध्ये मावळ तालुक्यातील ताजे, लोहगड, बोरज, तुंग,माळवाडी, भुशी, माऊ गबाळे वस्ती, माऊ मोरमाची वाडी यांचा समावेश असून भोर तालुक्यातील मौजे धानवली खालची, मौजे जांभुळवाडी (कोर्ले), मौजे पांगारी सोनारवाडी, मौजे डेहेन वेल्हे तालु्क्यातील घोळ, मौजे आंबवणे, जुन्नर तालुक्यातील तळमाची वाडी, आंबेगाव फुलवडे अंतर्गत भगतवाडी, माळीण अंतर्गत पसारवाडी, आसाणे जांभोरी अंतर्गत काळेवाडी क्र.१ व २ खेड तालुक्यातील बेंडारवाडी, भोरगिरी पदरवस्ती, मुळशी तालुक्यातील भोसाळे, घुटके या गावांचा समावेश आहे.