सासवड : ‘माझिया वडिलाची मिरासिगा देवा, तुझी चरणसेवा पांडुरंगा’ हा अभंग होऊन दुपारी ठीक दीड वाजता संत सोपानकाकांच्या पालखीची मंदिर प्रदक्षिणा होऊन देऊळवाड्याच्या उत्तर दरवाजातून पालखी बाहेर पडली. या वेळी हजारो भाविकांनी माऊली व सोपानकाकांचा जयघोष केला. फुलांची उधळण केली. भाविकांनी पालखी खांद्यावर घेऊन सासवड गावातून मिरवत जेजुरी नाक्यापर्यंत आणली. त्याप्रसंगी रस्त्याच्या दुतर्फा हजारो भाविकांनी पालखीदर्शनाचा लाभ घेतला. टाळ-मृदंगाच्या गजरात, ग्यानबा-तुकारामच्या जयघोषात, भगव्या पताकांच्या गर्दीत हजारो वैष्णवांच्या साक्षीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचे धाकटे बंधू संत सोपानकाका महाराजांच्या पालखीचे आषाढवारीसाठी आज (दि. १0) सासवडवरून उत्साही वातावरणात पांगारे गावाकडे प्रस्थान झाले. विशेष म्हणजे अनेक वर्षांनंतर या प्रस्थान सोहळ्यास सकाळपासूनच वरुणराजाची उपस्थिती असल्याने भाविकांचा आनंद द्विगुणित झाला होता. सकाळी मंदिरात पहाटे ४ वाजता काकड आरती, महापूजा व धार्मिक विधी संपन्न झाले. त्यानंतर पहाटे ५ पासून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा सासवड येथे मुक्काम असल्याने संत सोपानदेवांच्या दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. सकाळी ११ वाजता प्रस्थान सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. सर्वप्रथम मानाच्या दिंड्यांना मंदिरात घेण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर सर्व दिंडीप्रमुखांचे मानाचे अभंग संपन्न झाले.मानकरी अण्णासाहेब केंजळे महाराज, देवस्थानचे प्रमुख गोपाळ गोसावी, सोहळाप्रमुख श्रीकांत गोसावी यांनी देवघरातून सोपानकाकांच्या पादुका आणून वीणामंडपातील पालखीमध्ये विधिवत स्थानापन्न केल्या. त्यानंतर सोपानदेव देवस्थान ट्रस्ट, संत सोपानकाका सहकारी बँक व सासवड नगरपालिका यांच्या वतीने सर्व दिंडीप्रमुखांच्या सत्काराचा कार्यक्रम झाला. सोपानकाका बँकेच्या वतीने संजय जगताप यांच्या हस्ते सर्व दिंडीप्रमुखांस तुळशीवृंदावन, श्रीफळ व महावस्त्र देण्यात आले. संत सोपानकाकांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याप्रसंगी मंदिरात तहसीलदार सचिन गिरी, नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, उपाध्यक्ष मनोहर जगताप, सुहास लांडगे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संजय जगताप, बँक आॅफ इंडियाचे प्रतिनिधी, तसेच पंढरपूर, आळंदी, देहू, मुक्ताईनगर, त्र्यंबकेश्वर आदी ठिकाणच्या देवस्थानांचे प्रतिनिधी व दिंडीप्रमुख, सासवडचे सर्व नगरसेवक, ग्रामस्थ व हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते.आज सकाळी पालखी सोहळ्याचे प्रमुख गोपाळ गोसावी यांच्या घरात सोपानदेव महाराज यांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले. तसेच सकाळी ११.३० वाजता केंजळे बंधू यांनी पादुका मंदिरात विधिवत नेल्या. त्यानंतर ‘धन्य धन्य निवृत्ती देवा ! काय महिमा वर्णावा !! शिवे अवतार धरून ! केले गेलो पावन !! समाधी त्र्यंबक शिखरी ! मागे शोभे ब्रह्मगिरी !! निवृत्तीनाथांचे चरणी ! शरण एका जनार्धनी !! हा प्रस्थान सोहळ्याचा अभंग म्हणण्यात आला. आणि टाळ-मृदंगच्या गजरात आणि अभंगाच्या तालात पालखी प्रस्थान सोहळा सुरु झाला. ............
जेजुरी नाका येथे सासवड नगरपालिका यांच्या वतीने सर्व विणेकरी आणि दिंडीप्रमुख यांचा सत्कार करून पालखी रथामध्ये ठेवण्यात आली. या वेळी सासवड व परिसरातील हजारो भाविक पालखी सोहळ्यास निरोप देण्यासाठी उपस्थित होते.वारीदरम्यान दररोज सोपानकाका बँकेच्या वतीने रथाला फुलांची सजावट करण्यात येणार आहे. रथासाठी सोरटेवाडीच्या केंजळे परिवाराच्या बैलजोडीचा मान असून नितीन कुलकर्णी यांचा नगारावादन, तर अंजनगावचे परकाळे व सासवडचे भांडवलकर या कुटुंबातील अश्व पालखीसमवेत मार्गक्रमण करत आहेत. तसेच संत सोपानकाका बँकेच्या वतीने चांदीचा रथ, फुलांची सजावट, पाण्याचा टँकर, रुग्णवाहिका, डॉक्टर व औषधे दरवर्षी देण्यात येतात. ४दुपारी २.३०च्या दरम्यान जेजुरी नाक्यावर हजारो भाविकांनी पालखीला निरोप दिल्यानंतर हा सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. पालखीचा आज पांगारे या गावी मुक्काम आहे.