पुणे : मी आयुष्यात काही कमावले नाही. नोकरी नाही, सॉरी पप्पा, मला जगण्याचा काही अधिकार नाही, मी आत्महत्या करीत आहेत, अशी फेसबुकवर पोस्ट टाकून मोबाईल बंद करुन आत्महत्या करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या तरुणीचा महिला सहाय्य कक्षातील दामिनी पथकाने काही तासात शोध घेऊन तिचे समूपदेशन केले. आत्महत्येपासून या तरुणीला परावृत्त करुन आईवडिलांच्या स्वाधीन केले.पोलीस उपायुक्त बच्चनसिंह यांना फेसबुकवर एका ३० वर्षाच्या तरुणीची फेसबुक पोस्ट आली होती. त्यात तिने आत्महत्या करणार असल्याचे म्हटले होते. त्यांनी ही बाब तातडीने महिला सहाय्य कक्षाला कळविली. सहायक पोलीस निरीक्षक सुजाता शानमे व महिला पोलीस शिपाई रासकर यांनी तिची माहिती घेतली तर तिने मोबाईल बंद केला होता.
तांत्रिक विश्लेषणावरुन दामिनी मार्शलांनी तिच्या घराचा पत्ता शोधून काढला. आईवडिलांकडे चौकशी केली तर त्यांना याबाबत काहीच माहिती नव्हती. ती नेहमीप्रमाणे बाहेर गेली होती. आपली मुलगी आत्महत्या करायला घराच्या बाहेर पडल्याचे समजल्यावर या वयाेवृद्ध दाम्पत्याला धक्काच बसला. मोबाईल बंद करण्यापूर्वी तिने कोणाकोणाला काॅल केला होता, याची माहिती पोलिसांनी काढली. त्यात एका मित्राची माहिती मिळाली. त्याला ती मोबाईल देण्यासाठी आली होती.
दामिनी पथकाने तातडीने परिसरात शोध घेतल्यावर कोथरुड येथे ती एका ठिकाणी बसलेली आढळून आली. पथकाने तिला कोथरुड पोलीस ठाण्यात आणले. तिच्याकडे आस्थेवाईकपणे चौकशी केली. नोकरी नसल्याने नैराश्य आले होते. आपल्याला लग्नाचा अधिकार नाही, असे वाटून आत्महत्या करीत असल्याचे पोस्ट फेसबुकला टाकली होती. सुजाता शानमे यांनी तिचे समुपदेशन केले. आईवडिलांना बोलावून तिला त्यांच्या स्वाधीन केले. आईवडिलांनी दामिनी पथकाचे आभार मानले. एका पोस्टमुळे आत्महत्या करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या तरुणीला वाचविण्यात पोलिसांना यश आले.