रविकिरण सासवडे
बारामती : बारामती तालुक्यातील युवकांनी पुढाकार घेत ऊसतोड मजुरांसाठी बारामती तालुक्यातील पहिलेच आरोग्य शिबिर घेतले. दिवंगत मित्राला या शिबिराद्वारे आगळीवेगळी श्रद्धांजली वाहत गरजू, गरीब घटकांच्या आरोग्यासाठी प्रयत्न करण्याचा मानस या युवकांनी व्यक्त केला.
बारामती तालुक्यातील जळगाव सुपे येथील जयेश जगन्नाथ जगताप या युवकाचा मार्च २०१८ मध्ये अपघाती मृत्यू झाला होता. मनमिळाऊ आणि हसतमुख असणाऱ्या जयेशचा मृत्यू सर्वांच्याच काळजाला चटका लावून गेला. जयेशच्या वर्गातील विद्यार्थ्यांनीदेखील जयेशसाठी काहीतरी करायला हवे असा संकल्प केला. आनंद लोखंडे या युवकाने पुढाकार घेत ऊसतोड मजूर, महिला आणि त्यांच्या मुलांसाठी आरोग्य शिबिर घेऊ, अशी सूचना मांडली. सुचना अभिजित गदादे, रईस शेख, ललिता हाके, राहुल हाके, रविराज हाके, हृषीकेश जगताप या मित्रांनी उचलून धरली. जयेशचे वडील व उज्ज्वल आरोग्य सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ जगताप यांनीदेखील सहकार्य केले. यानंतर सोमेश्वरनगर येथील सोमेश्वर कारखान्यावर हे शिबिर घेण्याचे ठरले. राजकीय वा सामाजिक पार्श्वभूमीशिवाय मित्राला श्रद्धांजली वाहण्यासाठी हे आरोग्य शिबिर घेत आहेत, ही गोष्ट कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनादेखील भावली. जगताप यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. रविवारी (दि. १६) कारखान्याच्या कार्यस्थळावर आरोग्य शिबिर घेतले. शिबिरात जयेशच्या १७ मित्र-मैत्रिणींनी मजुरांच्या पालावर जाऊन माहिती दिली. बारामती शहरातील डॉ. रमेश भोईटे, डॉ. राजेश कोकरे, सोमेश्वरनगर येथील डॉ. अनिल कदम यांनी देखील रुग्णांच्या तपासणीसाठी सहकार्य केले. या शिबिरात सुमारे ४०० रुग्णांची तपासणी केली. यामध्ये महिलांचा समावेश लक्षणीय होता. तर २३ रुग्णांना मधुमेह, रक्तदाब, तीव्र सांधेदुखीची लक्षणे आढळली. या वेळी महिलांची हिमोग्लोबिन तपासणी करून त्यांना आवश्यक औषधांचे वाटप करण्यात आले. बालकांच्या आजारावरदेखील उपचार केले. काही कार्यक्रमानिमित्त माजी उपमुख्यमंत्री अजित पवार सोमेश्वरनगर परिसरात होते. पवार यांना ऊसतोड मजुरांसाठी आयोजित पहिल्याच आरोग्य शिबिराची माहिती मिळाली. पवार यांनीदेखील या शिबिराला भेट देत युवकांचे कौतुक केले.ऊसतोड मजुरांमध्ये सांधेदुखीच्या आजारांनी त्रस्त असणाºयांची संख्या अधिक होती. ३०-४० किलोची उसाची मोळी उचलून वाहनात भरणे हे कष्टाचे काम आहे. त्यामुळे साहजिकच रोजच्या कष्टाने या मजुरांच्या हाडांची झीज होते. परिणामी असे आजार होतात, असे निरीक्षण या वेळी आरोग्य शिबिरात नोंदवले.शहर परिसरात मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबिरे होतात. मात्र ऊसतोडणी मजूर राज्याच्या कानाकोपºयातून आलेला असतो. हातावरचे पोट असणाºया या मजुरांना आरोग्यासाठी खर्च परवडत नाही. या जाणिवेतूनच या मजुरांसाठी शिबिर घेण्याचे आम्ही ठरवले. यापुढेदेखील आम्ही ऊसतोडणी मजुरांसाठी आरोग्य शिबिर घेणार आहोत, अशी माहिती आनंद लोखंडे याने दिली.