पुणे : विक्रमी संख्येने गणेशमूर्ती तयार केल्यानंतर महापालिका आता ढोलवादनाचा आवाज घुमवण्यास सज्ज झाली आहे. त्यासाठीची सर्व तयारी महापालिकेने पूर्ण केली असून, गणेशमूर्तींप्रमाणेच नियोजित संख्येपेक्षा अधिक संख्येने ढोलवादक सहभागी होतील, असा प्रशासनाचा अंदाज आहे. आतापर्यंत ३ हजार ६०० जणांनी नावनोंदणी केली आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा विक्रमी कार्यक्रम होणार आहे.बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे रविवारी (दि. २७) संध्याकाळी ५ वाजल्यापासून पुढे २५ मिनिटे ढोलवादन होईल. महापालिकेच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष याअंतर्गत स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी या कार्यक्रमाची संकल्पना मांडली होती. ती आता प्रत्यक्षात येत आहे.पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक व शहरातील आमदार, पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित राहणार आहेत. दुपारी बारा वाजल्यापासूनच मैदानात सरावाला सुरुवात होईल. दुपारी दोन वाजेपर्यंत नावनोंदणी करता येणार आहे. सायंकाळी बरोबर पाच ते पाच वाजून २५ मिनिटांपर्यंत ढोलवादनाचा मुख्य कार्यक्रम होईल.सुमारे सात वर्षांपूर्वी कोल्हापूरमध्ये १ हजार ५०० जणांचे एकत्रित ढोलवादन झाले होते. त्यानंतर राज्यात प्रथमच पुण्यामध्ये हा कार्यक्रम होत आहे. त्याची गिनीज बुकात नोंद होण्यासाठीची सर्व पूर्तता महापालिकेने केली आहे. त्यांचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित राहून चित्रीकरण करतील, अशी माहिती मोहोळ यांनी दिली.३ हजार विद्यार्थ्यांनी गणेशमूर्ती तयार करायच्या असे उद्दिष्ट ठेवले होते. प्रत्यक्षात ३ हजार ८२ विद्यार्थ्यांनी गणेशमूर्ती तयार केल्या. आता ५ हजार युवक-युवती ढोल वाजवतील, असे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत साडेतीन हजार जणांनी नावनोंदणी केली. त्यात उद्या दुपारपर्यंत मोठी वाढ होईल, असा विश्वास आहे.- मुरलीधर मोहोळ
बालेवाडीत घुमणार ढोलांचा आवाज; महापालिकेची तयारी पूर्ण, पथकांची संख्या वाढण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 3:20 AM