पुणे : स्टॉक मार्केट ट्रेडिंग करून अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ज्येष्ठ महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शनिवारी (दि. २०) सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
अधिक माहितीनुसार, याबाबत मोहम्मदवाडी परिसरात राहणाऱ्या एका ५६ वर्षीय महिलेने पोलिसांत फिर्याद दिली आहे. ही घटना ४ मार्च ते २८ मार्च या दरम्यान घडली आहे. फिर्यादी महिला इंस्टाग्रामवर सर्फिंग करत असताना त्यांना शेअर मार्केट संबंधित एक पोस्ट दिसली. त्यांनी पोस्टमध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क केला असता सायबर चोरट्याने स्टॉक बाबत माहिती देतो असे सांगितले. वेगवेगळ्या शेअर मार्केट ट्रेडिंग आणि आयपीओ खरेदी- विक्री करून चांगला मोबदला मिळतो असे सांगितले. फिर्यादी महिलेने सकारात्मक प्रतिसाद दिल्यावर त्यांना एका टेलिग्राम ग्रुपमध्ये ॲड केले. त्यामध्ये दररोज शेअर मार्केट आणि आयपीओमध्ये गुंतवणूक संदर्भात माहिती दिली जात होती. गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळतो, असे वेगवेगळे स्क्रिनशॉट पाठवून भासवले जात होते. त्यातील एका व्यक्तीने अधिकृत एजंट असल्याचे सांगून तीन ते चार पट नफा मिळवून देण्याच्या आमिषाने एक अप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगितले. फिर्यादींना अप्लिकेशन डाउनलोड करून ऑनलाईन पद्धतीने पैसे गुंतवण्यास सुरुवात केली. यात फिर्यादी यांनी तब्बल ३ कोटी ४ लाख रुपयांची गुंतवणूक केली. त्यांच्या ॲपवर शेअर ट्रेडिंगमधून फायदा झाल्याचे दिसून येत होते म्हणून त्या पैसे भरत गेल्या. मात्र, पैसे काढतांना त्यांच्या लक्षात आलं एकी ते पैसे काढता येत नव्हते म्हणून त्यांनी सायबर चोरट्यांशी संपर्क केला तेव्हा वेळोवेळी आणखी पैसे भरा असा तगादा लावला जात होता. पैसे मिळणार नाहीत, याची खात्री झाल्यावर त्यांनी पाेलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.