पुणे : इमारतीच्या मुख्य खांबालाच (कॉलम) तडे गेल्याने संबंधित अनधिकृत इमारत जमीनदोस्त करण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे. मात्र, या इमारतीमधील कुटुंबांचे काय असा प्रश्न आता सर्वांसमोर उभा राहिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील कोंढवा खुर्द भागातील श्री संत ज्ञानेश्वर नगर सर्व्हे नं 45 मधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामागे बाजूस दोन गुंठयामध्ये पाच मजली इमारत काही महिन्यापुर्वी बांधण्यात आली. या इमारतीमध्ये 16 फ्लॅट आहेत. सोमवारी संध्याकाळी इमारतीच्या पुढच्या बाजूला जोरात आवाज आला. त्यामुळे घाबरलेल्या रहिवाश्यांनी पाहणी केली असता त्यांना पुढील खांबाला तडे गेल्याचे दिसून आले. भयभीत नागरिकांनी तात्काळ महापालिका आणि पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर महापालिकेने जागेची पाहणी केली असता इमारत अनधिकृत असल्याचे समोर आले आहे. धोका ओळखून सध्या इमारत रिकामी करण्यात आली आहे. महापालिका तात्काळ ऍक्शन घेत इमारत जमीनदोस्त करणार असून संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाणार आहे.
याबाबत महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे म्हणाले की, हा प्रकार अतिशय गंभीर आहे. हे बांधकाम अनधिकृत असल्याने उद्या इमारत पाडली जाईल. तसेच याप्रकरणी दोषी असलेल्यांवर कारवाई करू, असेही त्यांनी म्हटले.