पुणे : लहानपणी ताटात शिल्लक असलेलं अन्न खाण्यासाठी चिमणी यायची. ते अन्न घेवून भुर्रर्कन ऊडून जायची. आता एखादीच चिमणी नजरेस पडते. वाड्यांच्या शहरात आता इमारतींचं जंगल ऊभे राहिले. तेव्हापासूनच अंगणात सकाळी, सायंकाळी किलकिलणाऱ्या चिमण्या दिसणे जणू दुरापास्तच होत चालले आहे. पक्षी निरीक्षक, वाल्इड फोटोग्राफर विश्वजित नाईक चिमण्यांच्या नाहीशा होण्याची खंत व्यक्त करतात. पुढच्या पिढीला दाखविण्याकरिता का होईना चिमण्या राहाव्यात याकरिता नाईक यांनी सध्या पुढाकार घेतला असून कृत्रिम घरटे नावाची संकल्पना ते गेल्या काही वर्षांपासून राबवत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या जागतिक स्पॅरो डे निमित्त ‘लोकमत’ ने त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी बदलत्या वातावरण, प्रदूषणामुळे चिमण्या हरवल्या. माणसाने त्याला हवा तसा त्याच्या राहणीमानात केलेला बदल निसर्गातील अनेक घटकांना मानवला नाही.चिमण्या हे त्यातीलच एक उदाहरण. चिमण्यांच्या विणीचा हंगाम वर्षभर सुरू असतो. मात्र, त्या ज्या ठिकाणी घरटे करत असत. ती ठिकाणी आपण नष्ट केली. पूर्वी वाड्यातील भिंतीच्या एखाद्या सापटीत, घरातील विजेच्या बोर्डाच्या वरील जागेत, माळ्यावरील एका कोपºयात, गारव्याच्या ठिकाणी चिमण्यांनी आपली घरटी उभारली असायची. आता एखादीच कुठे नजरेस पडते. चिमण्या जगाव्यात यासाठी नाईक सतत प्रयत्नशील असून त्याकरिता ते लहानांपासून मोठ्यापर्यत कार्यशाळा घेतात. उज्वल भविष्यासाठी निसर्गाचे संरक्षण याविषयावर व्याख्याने देऊन मार्गदर्शन करतात. आपले वडील डॉ. सत्यशील नाईक यांच्यापासून पक्षीनिरीक्षण आणि त्यांच्या अभ्यासाचा छंद जोपासणाऱ्या विश्वजित यांनी आपल्या घरी पक्ष्यांच्या संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणावर कृत्रिम घरटी तयार केली आहेत. सध्या त्यांच्या या घरट्यात पोपट, कोकीळ, बुलबुल, सातभाई, शिंपी, साळुंखी, शिपाई, बुलबुल, लालबुड्या बुलबुल, धनेश, असे अनेक पक्षी मुक्कामाला आहेत. बारामती तालुक्यातील निमगाव केतकी गावातील वैभव जाधव हे मागील तीन वर्षांपासून स्पॅरो डे साजरा करत आहेत. यानिमित्ताने ते परिसरातील अनेक पक्षी अभ्यासकांना, निरीक्षकांना, पक्षी संवर्धनासाठी घरातील टाकाऊ वस्तूपासून उपयोगी वस्तू तयार करत असून याला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देखील मिळत आहे. खेडेगावातील तरुणांमध्ये पर्यावरण जागृती आणि पक्षीप्रेम वाढीस लागावे यासाठी जाधव यांचा प्रयत्न कौतुकास्पद म्हणावा लागेल.
.............* वैभवचं ’’चिमणी प्रेम’ * चिमण्या कमी झाल्या कशा? वैद्यकीय व्यवसायात अनेक वर्षे केलेल्या डॉ. सत्यशील नाईक यांनी जोपासलेल्या आणि त्याचा वारसा पुढे नेणाऱ्या विश्वजित यांचा पक्ष्यांवरील अभ्यास दांडगा असून शहरातील चिमण्यांची घटती संख्या यावर त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले. १. पूर्वी घरातील खरकटे परसात फेकून दिले जायचे.ते खायला चिमण्या गर्दी करत.आता ते खरकटे प्लॅस्टिक पिशवीत भरून डब्यात टाकले जाते. २. राहत्या जागी स्वच्छतेच्या नावाखाली केले जाणारे पेस्टकंट्रोल यामुळे घरातील झुरळ नाहीशी झाली. ही झुरळे खाण्यासाठी घरात चिमण्या येत असत. घरात जिथे जागा मिळेल तिथे घरटी करून राहणाऱ्या चिमण्यांना त्या घाण करतात या नावाखाली त्यांची घरटी काढून टाकली जातात. त्यामुळे त्यांना कुठे जागाच उरली नाही. ३. मोबाईल रेडिएशन चा मोठ्या प्रमाणावर दुष्परिणाम चिमण्यांवर झाला असून त्यामुळे त्यांचे स्थलांतर देखील वाढले आहे.