निनाद देशमुख
पुणे: कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून मित्रराष्ट्रांच्या लष्करासोबत दरवर्षी होणारे संयुक्त लष्करी युद्ध प्रशिक्षण सराव लष्कराच्या दक्षिण मुख्यालयांतर्गत पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. यासाठी कमांडच्या तयारीचा आढावा घेतला जात असल्याचे लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. इतर देशांच्या लष्करांच्या डावपेचांचे आदानप्रदान करण्यासाठी तसेद द्विपक्षीय संबंध आणखी दृढ करण्यासाठी मित्रराष्ट्रांसोबत लष्करी कवायती आणि संयुक्त सराव दरवर्षी आयोजित केल्या जातात. रशिया, अमेरिका, बांग्लादेश, श्रीलंका, मालदिव, व्हिएतनाम, अफगाणिस्तान यांसारख्या अनेक मित्रराष्ट्रांच्या सैन्याशी संयुक्त युद्धसरावांचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. पुण्यात दक्षिण मुख्यालयांतर्गत आतापर्यंत अनेक महत्त्वाचे संयुक्त युद्धसराव झाले आहे. यात भारत-चीन दरम्यान युद्धसरावांचाही समावेश आहे. मात्र, गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे हे युद्ध सराव थांबवण्यात आले होते. मात्र, पुन्हा वरिष्ठ पातळीवरून हे युद्धसराव सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
दक्षिण मुख्यालयाने २०१९ मध्ये श्रीलंकेच्या सैन्याबरोबर ‘मित्रशक्ती’ या १४ दिवसांचा संयुक्त लष्करी सराव आयोजित केला होता. यानंतर कोरोनामुळे पुढील नियोजित युद्ध सरावांचे आयोजन करता आले नाही. सोमवारी (दि. ९) दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन यांनी पुण्यातील औंध येथे शिवनेरी ब्रिगेडला भेट दिली. येथील परदेशी प्रशिक्षण केंद्रातील सुविधांंची त्यांनी पाहणी केली.
इतर देशांच्या लष्कराबरोबर होणाऱ्या आगामी लष्करी सरावाबद्दल त्यांना माहिती देण्यात आली. या वेळी त्यांनी सैनिकांसोबत संवाद साधला. भविष्यातील प्रसंगाबाबत सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या.
आैंध मिलिटरी स्टेशन येथील परदेशी प्रशिक्षण केंद्रात संयुक्त सरावासाठी लागणाऱ्या सर्व पायाभूत सुविधांची निर्मिती दक्षिण मुख्यालयामार्फत तयार करण्यात आली आहे. या ठिकाणी सिम्युलेटेड टीन शेड, लहान आकारांची छोटी घरे, तसेच प्रत्यक्ष युद्धभूमीचा अनुभव देणाऱ्या काल्पनिक युद्धभूमी या ठिकाणी तयार करण्यात आली आहे. या ठिकाणी मोठे मैदान असून येथे हेलिकॉप्टरमधून दोरीच्या साह्याने थेट युद्धभूमीत उतरणे, जखमींना नेले यासारख्या कवायती केल्या जातात, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
कोट
संयुक्त राष्ट्रांच्या आदेशानुसार बंडखोरी आणि दहशतवादविरोधी कारवायांचा बीमोड करण्यासाठी संयुक्त कार्यवाही करण्याची क्षमता विकसित करण्यासाठी तसेच व्यूहरचनात्मक डावपेचांचे आदानप्रदान करण्यासाठी हे सराव महत्त्वाचे आहेत.
- निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर
चौकट
भारताचे मित्रराष्ट्रांच्या लष्कराशी होणारे युद्ध सराव आणि त्यांची नावे
लष्करी सराव :
भारत रशिया (इंद्र), भारत थायलंड (मैत्री), भारत नेपाळ (सूर्य किरण), भारत चीन (हँड इन हँड), कजाकिस्तान भारत (प्रबल दोस्ती), मंगोलिया भारत (नोमैडिक एलिफंट), किर्गिस्तान आणि भारत (खंजर), मंगोलिया भारत (खान क्वेस्ट), भारत अमेरिका (सॅल्वेक्स, युद्ध अभ्यास, वज्र प्रहार), श्रीलंक भारत (मित्र शक्ति), युके भारत (अजय योद्धा), भारत मालदिव (एकुवेरिन). भारत बांग्लादेश (संप्रती), भारत सिंगापूर (बोल्ड कुरुक्षेत्र, अग्नियोद्धा), भारत इंडोनेशिया (गरुडशक्ती), ओमान भारत (अल नागह), व्हिएतनाम भारत (विनबॅक्स), म्यानमार भारत (इम्बाक्स), सेशेल्स भारत (लमित्ये)
नौदलाचे युद्धसराव
फ्रान्स -भारत (वरुण), यूएसए, जापान भारत (मालाबार), श्रीलंक भारत (स्लिनेक्स), सिंगापुर भारत (सिमबेक्स), यूके भारत (कोंकण), साउथ आफ्रिका, ब्राझील भारत (आईबीएसएएमएआरएआर), ऑस्ट्रेलिया भारत (औसिंडिक्स), जापान भारत (सहयोग कैजिन), ओमान भारत (नसीम अल बहर)
भारतीय वायुदल
अमेरिका भारत (रेड फ्लॅग, कोप इंडिया), भारत फ्रान्स (गरुड़), ब्रिटन भारत (इंद्रा धनुष), सिंगापूर भारत (सिंथेक्स), ओमान भारत (ईस्टर्न ब्रिज), संयुक्त अरब अमिरात भारत (डेझर्ट ईगल), थायलँड भारत (सियाम इंडिया)