पुणे : आर्मी मध्ये भरती होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. सरकारी नोकरीसह देशसेवेची संधी यातून मिळते. मात्र एका ठगाने टेरीटोरीअल आर्मीमध्ये भरती करण्याचे आमिष दाखवत ४२ मुलांची १ कोटी ८० लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सदर्न कमांडच्या लायझन युनिटने हा प्रकार उघडकीस आणला. आरोपीला १२ ऑक्टोबर रोजी तासगाव येथून अटक केली असून, याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पांडुरंग कराळे (४५, रा. स्टेशन रोड, गजानन नगर, पाटील मळा, तासगाव, जि. सांगली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हा प्रकार फेब्रुवारी २०२२ ते १५ सप्टेंबर २०२३ पर्यंतच्या काळात घडला.
महेश पंढरीनाथ ढाके (३५, रा. पाटण) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार महेश ढाके हे फेब्रुवारी २०२२ रोजी कामानिमित्त पुण्यात आले होते, त्यावेळी कोंढवा परिसरातील एका हॉटेलमध्ये ते बसले होते. शेजारी असलेल्या टेबलवर आर्मीममध्ये आमची ओळख असून मी भरतो असे एक इसम बोलत होता. हे ऐकून ढाके यांनी त्याला खरच तुमची आर्मीसाठी भरती करता का असे विचारले असता आरोपीने माझे आर्मीतील मोठे अधिकारी चांगले ओळखीचे आहेत, तुमचे कोण नातेवाईक असतील तर सांगा, असे म्हणत स्वत:चे नाव पांडुरंग कराळे सांगितले, आणि स्वत:चा मोबाइल क्रमांक ढाके यांना दिला.
यानंतर कराळे हा एक-दोन दिवसाआड ढाके यांना फोन करून टेरीटोरीअल आर्मीमध्ये भरती निघणार असून, कोण असेल तर सांगा असे म्हणत होता. ढाके यांनी ही बाब त्यांच्या मित्राला सांगितली तेव्हा मित्राने स्वत:च्या मुलासाठी कराळेला विचार असे सांगितले. त्यावर कराळेने एका उमेदवारासाठी ६ लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले. यानंतर ढाके यांच्या मित्राच्या मुलाने त्याच्या मित्रांना देखील याबाबत सांगितले. असे करत करत ४२ उमेदवार ढाकेंनी तयार केले. या उमेदवारांकडून एकूण १ कोटी ८० लाख रुपये ढाकेंनी घेत पांडुरंग कराळेला दिले.
यानंतर ढाकेंनी कराळे सांगेल त्यावेळी टप्प्याटप्प्याने मुलांना आद्रकी टोलनाका, बेळगाव येथे घेऊन गेले. यावेळी मुलांकडून आर्मी भरतीसाठी लागणारी सर्व कागदपत्रे देखील कराळेनी मागवली. या ४२ मुलांची खोटी वैद्यकीय तपासणी यावेळी कराळेनी त्याच्या अन्य साथीदारांसह केली. यानंतर ढाके यांनी लेखी परीक्षेसंदर्भात कराळेला विचारले असता, त्याने या मुलांची बनावट हॉल तिकीट ढाकेंना पाठवली. त्यानंतर तो परीक्षेसाठी तारखांवर तारखा देत होता, मात्र दरवेळी परीक्षेची तारीख पुढे ढकलल्याचे सांगायला लागला. यानंतर महेश ढाके यांनी एकतर परीक्षेचे नक्की कळवा अन्यथा पैसे परत द्या अशी मागणी केली. ते देण्यास कराळे टाळाटाळ करायला लागल्याने ढाके यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
डमी उमेदवार पाठवून पकडले..
दरम्यान, अशा पद्धतीने लोकांची फसवणूक होत असल्याची कुणकुण सदर्न कमांडच्या लायझन युनिटला लागली होती. त्यांनी पांडुरंग कराळे चा शोध घेत, त्याच्यावर पाळत ठेवली. एक डमी उमेदवार त्यात घुसवून कराळे सांगेल ती प्रक्रिया पार पाडली. त्यानंतर गुरूवारी कराळेला त्याच्या घरातून पोलिसांमार्फत ताब्यात घेण्यात आले. यावेळी कराळेच्या बँक खात्यामध्ये लाखो रुपयांचे व्यवहार आढळून आले असून, उमेदवारांची कागदपत्रे देखील हस्तगत करण्यात आली आहेत.