पुणे : भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून केलेल्या कारवाईनंतर देशातील सर्व हवाई तळ आणि लष्करांच्या सदर्न कमांडला सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत़ पुण्यात लष्कराचे देशातील सर्वांत मोठे मुख्यालय व हवाई दलाचा तळ आहे़ येथील यंत्रणा मंगळवारी सज्ज करण्यात आली आहे़ लष्कराची यंत्रणा, साधनसामग्री लोहगाव येथील हवाई तळावर हलविण्यासाठी शहर पोलिसांची मदत घेण्यात आली होती़
पुणे शहरात लष्कराचे सर्वांत मोठे मुख्यालय (दक्षिण कमांड) आहे. तसेच दारूगोळा कारखाने, आयुध निर्माण संस्था, संशोधन संस्था, प्रशिक्षण संस्था, हवाई दलाचा तळ, लष्करी रुग्णालय अशा महत्त्वाच्या संस्था आहेत. कारवाईनंतर लष्कराला हाय अॅलर्ट देण्यात आला आहे़ त्यामुळे लष्कराचे सर्व विभाग सज्ज ठेवण्याच्या हालचाली सुरूझाल्या आहेत़ सीमावर्ती भागात कोणतीही मदत लागल्यास ती तातडीने पुरविता यावी, यासाठी सदर्न कमांड व हवाई दलाची साधनसामग्री लोहगाव येथील हवाई दलाच्या तळावर हलविण्यात आली़ ही साधनसामग्री व्यवस्थितपणे हलविता यावी, यासाठी शहर पोलीस दलाची मदत घेण्यात आली़ ही सामग्री घेऊन जाणाऱ्या लष्करी वाहनांच्या ताफ्याला शहरातील वाहतुकीचा अडसर होऊ नये, यासाठी रस्त्यावर चॅनेल करून देण्यात आला होता़
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, शहरातील महत्त्वाच्या लष्करी केंद्राच्या परिसरात गस्त वाढविण्यात आली आहे़ लष्कराच्या मागणीनुसार पोलिसांची मदत त्यांना पुरवण्यात आली. लष्कराची यंत्रसामग्री सुरक्षितपणे हलवण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात आली. नेहमीच्या तुलनेत पोलिसांचा बंदोबस्त वाढण्यात आला आहे. जेव्हा जेव्हा हवाई दल तसेच लष्कराला आवश्यक ती मदत लागेल, त्यानुसार शहर पोलीस दलाकडून ती पुरविण्यात येणार आहे़