पुणे : राज्यात सध्या सुरू असलेल्या दमदार पावसामुळे खरीप पेरण्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, राज्यात आतापर्यंत ६८ टक्के अर्थात ९६ लाख हेक्टर होऊन अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे. खरिपातील महत्त्वाच्या सोयाबीन व कापूस पिकांचीदेखील पेरणी मोठ्या प्रमाणावर झाली असून, सोयाबीनचे क्षेत्र ९१ टक्के, तर कापूस पिकाखालील क्षेत्र ७६ टक्के पेरणी झाली, अशी माहिती राज्याचे कृषी संचालक विनय आवटे यांनी दिली.
सर्वाधिक ८७ टक्के पेरण्या संभाजीनगर विभागात
राज्यात खरीप पिकाखालील सर्व क्षेत्र १ कोटी ४१ लाख २ हजार ३१८ हेक्टर इतके असून, आतापर्यंत ९६ लाख ४४ हजार ४१७ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. गेल्या वर्षी याच तारखेला केवळ २० लाख ५१ हजार ९१५ हेक्टरवर पेरण्या झाल्या होत्या. राज्यात सोयाबीनचे सरासरी क्षेत्र ४१ लाख ४९ हजार ९१२ हेक्टर असून, राज्यात आतापर्यंत ३७ लाख ५७ हजार २९७ हेक्टरवर अर्थात ९१ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
राज्यात गेल्या वर्षी तीन जुलैला केवळ ४ लाख ७३ हजार २३२ हेक्टर पेरण्या झाल्या होत्या. राज्यात कापसाखालील मुख्य क्षेत्र हे मराठवाडा आणि विदर्भात असून, या भागात चांगला पाऊस झाल्याने कापसाच्या पेरणीखालील क्षेत्रातदेखील वाढ झाली आहे. राज्यात आतापर्यंत ३१ लाख ९१ हजार २८९ हेक्टरवर अर्थात ७६ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. राज्यात सरासरी ४२ लाख १ हजार १२८ हेक्टर क्षेत्र कापसाखाली आहे.
दीड लाख हेक्टरवर भाताची लागवड
गेल्या वर्षी याच तारखेला केवळ १२ लाख ३७ हजार ८५५ हेक्टरवर कापसाची लागवड झाली होती. संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांचा काही भाग, तसेच पूर्व विदर्भातही पावसाने आता हजेरी लावली असून, भात रोपांची लावणी करण्याचे कामही सुरू आहे. राज्यात आतापर्यंत १ लाख ५४ हजार १५८ हेक्टर अर्थात १० टक्के क्षेत्रावर भाताची लागवड पूर्ण झाली आहे.
पीकनिहाय पेरणी
विभाग पेरणी झालेले क्षेत्र टक्के
तूर -८,३३,३७६—६४
मूग १,७४,२२३—४४
उडीद २,५८,३४८—७०
ज्वारी ५६,७२९---२०
बाजरी ३,०८,२७८—४६
भुईमूग ९८,८०३—५२
राज्यात पाऊस चांगला झाला आहे. पेरणी झालेल्या पिकावर आता खते टाकावीत. आंतरमशागतीची कामे करावीत.
- विनय आवटे, कृषी संचालक