शेलपिंपळगाव : खरीप पिकांच्या पेरणीअभावी शेतात पालेभाज्यांची टाकणी करण्याचा पर्याय शेतकऱ्यांनी निवडला आहे. विविध पालेभाज्यांचे उत्पादन घेऊन त्यापासून आर्थिक उत्पन्न प्राप्त करण्याचा मानस शेतकरीवर्गात जोरात सुरू आहे. मागील दीड ते दोन महिन्यांपासून पालेभाज्यांना बाजारात प्रचंड मागणी असल्याने भाज्यांचे दरही उच्चांकी पातळीवर टिकून राहिल्याने शेतकऱ्यांसाठी ही एक जमेची बाजू ठरणार आहे.चालू पावसाळी हंगामाला सात जून मृग नक्षत्रापासून सुरुवात झाली आहे. मात्र, प्रारंभीच्याच नक्षत्रात पावसाने ओढ दिल्याने ओलीअभावी शेतात खरीप पिकांच्या पेरण्या करता येत नसल्याने हजारो हेक्टर क्षेत्र पेरणीअभावी पावसाच्या प्रतीक्षेत आहे. खरीप पिकांच्या पेरण्यांना कालावधीपेक्षा जास्त उशीर होत असल्याने बहुतांशी शेतकरी शेतात विविध पालेभाज्या तसेच तोडणीयुक्त पिकांच्या लागवडी करण्यास पसंती देत आहेत. तोडीव पिकांनाही मार्केटमध्ये चांगला बाजारभाव लाभत असल्याने शेतकऱ्यांचे खरिपाचे ‘आर्थिक’ बजेट समतोलात ठेवण्याचा प्रयत्न बळीराजा करत आहे. हंगामात पावसाअभावी पेरणीयुक्त पिकांची पीछेहाट होत असल्याने शेतकऱ्यांचे पीक नियोजन कोलमडले जाऊ लागले आहे. यावर उपाय म्हणून बहुतांशी शेतकऱ्यांनी पालेभाज्या, तोडीव माल व फुलशेती करण्यास पसंती दिली आहे. शेतातील टाकणीयुक्त पालेभाजांची पिके चार-पाच दिवसांची झाली असून, बियाणांना मोड येऊ लागले आहेत. (वार्ताहर)खरीप हंगामाच्या तोंडावरच पावसाने दडी मारल्याने पेरण्यांची कामे प्रलंबित आहेत. हा तिढा सोडवण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतात पालेभाज्यावर्गीय पिकांचे उत्पादन घेण्याकडे पसंती दिली आहे. साधारण महिना ते दीड महिन्यात पूर्णत्वास येणाऱ्या पालेभाज्यांची टाकणी शेतकऱ्यांनी शेतात मोठ्या प्रमाणावर पूर्ण केली आहे. खेडच्या पूर्व भागातील शेलगाव, दौंडकरवाडी, शेलपिंपळगाव, वडगाव-घेनंद, मरकळ, गोलेगाव, बहुळ, साबळेवाडी, सिद्धेगव्हाण, नवीनगाव, मोहितेवाडी, चिंचोशी आदी गावांसह शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात पालेभाज्या टाकणी सुरू आहे.
पेरणी लांबली; पालेभाज्या पर्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2016 4:50 AM