राजेंद्र सांडभोर, राजगुरूनरगेले काही वर्षे पडत असलेल्या अनियमित पावसामुळे आणि वाढत्या औद्योगिकीकरणामुळे खेड तालुक्यातील पीक पद्धत बदलली असून, भाताखालोखाल सोयाबीन हे खरिपाचे मुख्य पीक होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. आतापर्यंत तब्बल २७५ टक्के सोयाबीनची लागवड तालुक्यात झाली आहे. तर खरीप बाजरी दिवसेंदिवस नामशेष होण्याच्या मार्गावर या वर्षी अवघ्या १४ टक्के बाजरीच्या पेरण्या झाल्या आहेत. तसेच खरीप भुईमुगाचे क्षेत्रही वेगाने घटत असून या वर्षी ४३ टक्के भुईमूग पेरला गेला आहे. एकंदर खरिपाचे क्षेत्रच घटत चालले आहे. खेड तालुक्यात ५७००० हेक्टर खरिपाचे क्षेत्र आहे, असे सांगितले जाते. पण कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार तालुक्यात खरिपाचे क्षेत्र ५७६०० हेक्टर आहे. परंतु २००९ साली ४१६८२ हेक्टर, २०१० साली ४०८३६ हेक्टर, २०११ साली ४२२०१ हेक्टर, २०१२ साली ३२०६२ हेक्टर, २०१३ साली ३७३०० हेक्टर, २०१४ साली २९५४५ हेक्टर, २०१५ साली ४२४६९ आणि या वर्षी ४०५३० हेक्टरवर खरिपाची पेरणी झाल्याची कृषी खात्याची नोंद आहे. अलीकडच्या वर्षांमध्ये व्यावसायिक आणि औद्योगिक कारणांनी पिकांखालील क्षेत्र कमी होत चालल्याने मागील काही वर्षांचा आढावा घेऊन कृषी खात्याने खरीप क्षेत्राची सरासरी कमी केली असून, सध्या ४८६६७ हेक्टर सरासरी क्षेत्र निश्चित केले आहे. त्यानुसार या वर्षी ८३ टक्के खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. एकंदर खरीप क्षेत्र घटण्याबरोबर बाजरीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटले आहे. तालुक्यात एकेकाळी सर्वांत जास्त बाजरी खरीप पीक म्हणून घेतले जाई. सुमारे ११ हजार हेक्टरवर बाजरी घेतली जाई. बाजरी २००९ साली १०५०० हेक्टर, २०१० साली ९३०० हेक्टर, २०११ साली ९१०० हेक्टर, २०१२ साली २०३५ हेक्टर, २०१३ साली २५४३ हेक्टर, २०१४ साली ८१७ हेक्टर, २०१५ साली १०७४ आणि या वर्षी अवघ्या ५८९ हेक्टरवर खरीप बाजरीचे पीक घेतले गेले. बाजरीचे हे क्षेत्र पाहता खरीप बाजरी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.(वार्ताहर)
सोयाबीनही होतेय मुख्य पीक
By admin | Published: August 31, 2016 1:14 AM