लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सरकारने ठरवून दिल्याप्रमाणे शेतकरी स्वतःच्या उपयोगासाठी स्वतःचे बियाणे राखून ठेवत नाही. गरज असलेल्या सर्व बियाण्यांचा पुरवठा सरकार करू शकत नाही. त्यातूनच यंदाच्या खरिपात राज्यातील एकूण क्षेत्राच्या तुलनेत सोयाबीन तसेच भुईमूग वगैरे कडधान्यांचे बियाणे कमी पडण्याची चिन्हे आहेत.
राज्यात सोयाबीनचे क्षेत्र ४३ लाख ५० हजार हेक्टर आहे. त्यासाठी प्रतिहेक्टर ७५ किलो याप्रमाणे बियाणाची गरज आहे. बदल दराप्रमाणे एकूण गरजेच्या ३५ टक्के म्हणजे ११ लाख ४१ हजार ८७५ क्विंटल सोयाबीन बियाण्यांचा पुरवठा सरकारकडून होईल. भुईमूग, तीळ व अन्य कडधान्य पिकांच्या बाबतीतही हेच होऊन ऐन पेरणीच्या वेळेस सोयाबीन व कडधान्यांच्या बियाण्यांची कमतरता भासेल असे दिसत आहे.
त्यामुळेच सोयाबीनसह कडधान्याच्या बियाण्यांसाठी शेतकऱ्र्याने आपल्या शेतातील पिकामधले काही उत्पादन पुढील वर्षाचे बियाणे म्हणून बाजूला राखीव ठेवणे गरजेचे असते. एकदा प्रमाणीत बियाणे घेतले तर तो वाण सलग तीन वर्षे त्याच क्षमतेने चालू शकतो, असे शेतीतज्ज्ञांचे म्हणणे आहे. घरचेच बियाणे वापरले गेले तर खर्चातही बचत होते. म्हणूनच उत्पादनातील काही भाग शेतकऱ्र्यानी बियाणांसाठी राखीव ठेवावा अशी मोहीम सरकार कृषी खात्यामार्फत राबवत असते. मात्र चांगला भाव मिळतो, पैशांची गरज भासते म्हणून शेतकरी सर्व उत्पादनाची विक्री तरी करतो किंवा वापरतो. त्यातूनच बियाण्यांची, विशेषतः सोयाबीनसारख्या महागड्या बियाण्यांची कमतरता निर्माण होते.
महाबीज, बीज निगमकडून पुरवठा
एकूण गरजेएवढ्या बियाण्यांचा पुरवठा करणे सरकारसाठी अशक्य असल्याने सरकारने प्रत्येक बियाण्यांसाठी बदल दर लक्ष्यांक ठरवून दिला आहे. तो वगळूनच जिल्ह्यात किती बियाणे लागेल याचा अंदाज काढला जातो. यंदा त्यानुसार लागणाऱ्र्या ११ लाख ४१ हजार ८७५ क्विंटल सोयाबीन बियाणाचा पुरवठा महाबीज, राष्ट्रीय बीज निगम व खासगी कंपन्यांकडून होईल असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
फोटो- सोयाबीन, कडधान्ये