पुणे: गेल्या चार दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या घाट परिसरात चांगला पाऊस झाल्याने खरिपाच्या पेरण्यांना वेग आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ७७ हजार ९०५ हेक्टरवर पेरणी झाली असून सरासरी क्षेत्राच्या हे क्षेत्र ४० टक्के आहे. राज्यात गेल्या दोन-तीन वर्षांपासून सोयाबीन पिकाखालील क्षेत्र वाढत असून त्याचे चित्र पुणे जिल्ह्यातही दिसत आहे. त्यानुसार जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ३५ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. भाताच्या पुनर्लागवडीला देखील वेग आला असून महिनाअखेरपर्यंत भाताची पुनर्लागवड पूर्ण होईल, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी दिली.
जिल्ह्याच्या घाट परिसरात तसेच पश्चिम भागातील तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण चांगले आहे. त्यामुळे या तालुक्यांमध्ये पेरणीला वेग आला आहे जिल्ह्यात खरिपाचे १ लाख ९५ हजार ७१६ हेक्टर इतके सरासरी क्षेत्र आहे. तर पेरण्या झालेले क्षेत्र ७७ हजार ९०५ अर्थात ४० टक्के इतके आहे. जिल्ह्यात भात, बाजरी व सोयाबीन पिकाखाली सर्वाधिक क्षेत्र आहे. बाजरीचे सरासरी क्षेत्र ४७ हजार ५१८ हेक्टर असून आतापर्यंत केवळ १६ टक्के अर्थात ७ हजार ७९३ हेक्टरवर पेरणी होऊ शकली आहे. जिल्ह्याच्या पूर्वेकडील तालुक्यांमध्ये पावसाची हजेरी नसल्याने बाजरीच्या पेरण्या रखडल्या आहेत.
भाताची लागवड महिनाअखेर पूर्ण होणार
दुसरीकडे घाट परिसर व पश्चिम भागातील तालुक्यांमध्ये चांगला पाऊस झाला आहे. जिल्ह्यात भाताचे सरासरी क्षेत्र ५९ हजार ६२७ हेक्टर असून प्रत्यक्ष पुनर्लागवड झालेले क्षेत्र १५ हजार १८३ हेक्टर इतके आहे. सरासरीच्या हे क्षेत्र २५ टक्के इतके आहे. याबाबत काचोळे म्हणाले, “गेल्या चार दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे चिखलणीची कामे सुरू झाली आहेत. महिनाअखेरीस भात पुनर्लागवडीची सर्व कामे पूर्ण होतील आणि सरासरी इतकी लागवड होईल.”
सोयाबीनमध्ये मोठी वाढ
गेल्या तीन वर्षांपासून राज्यात सोयाबीन खालील चित्र वाढ होत आहे त्याचे प्रतिबिंब पुणे जिल्ह्यातही उमटत असून जिल्ह्यात सोयाबीनखाली सरासरी २० हजार ९८२ हेक्टर क्षेत्र असून यंदा ही लागवड ३४ हजार ५६६ हेक्टर अर्थात १६५ टक्के झाली आहे. इतर सर्व पिकांच्या तुलनेत जिल्ह्यात सर्वाधिक लागवड सोयाबीन पिकाखाली झाली आहे. विदर्भ, खानदेश, मराठवाड्यात शेतकरी प्रिय असलेले कापूस हे पीक पुणे जिल्ह्यातही ५० हेक्टर इतक्या सरासरी क्षेत्रावर लावले जाते. मात्र यंदा कापसाखालील क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ७९१ हेक्टरवर कापसाची लागवड झाली आहे.
मका ४४ टक्क्यांवर
जिल्ह्यात मका पिकाखालील सरासरी क्षेत्र १८ हजार ८२८ हेक्टर असून आतापर्यंत ८ हजार ३१४ अर्थात ४४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. नाचणी पिकाची लागवड ५४२ हेक्टरवर अर्थात १९ टक्के झाली आहे. तर ३२४ हेक्टरवर तूर पिकाची लागवड झाली आहे. मुगाखालील क्षेत्र ३ हजार ६६२ हेक्टर (सरासरीच्या २४ टक्के) असून उडीद पिकाचे क्षेत्र ४८२ हेक्टर (सरासरीच्या २८ टक्के) इतके आहे. भुईमुगाखाली यंदा ३ हजार २९९ हेक्टरवर (२१ टक्के) पेरणी झाली आहे.
सरासरीच्या ५४ टक्के पाऊस
जिल्ह्यात जूनमध्ये सरासरी १७६.२ मिमी पाऊस पडतो. प्रत्यक्षात ९०.७ अर्थात ५१.५ टक्केच पाऊस झाला. तर २१ जुलैअखेर १०४ मिमी पाऊस झाला असून जुलैची सरासरी १७९.६ मिमी आहे. सरासरीच्या हा पाऊस ५७.९ टक्के आहे. तर आतापर्यंतच्या सरासरीशी तुलना केल्यास जिल्हाया १९४.७ मिमी अर्थात ५४.७ टक्के पाऊस झाला आहे.