लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सोयाबीन पेरण्यांसाठी पुढच्या हंगामात बियाण्याची कमतरता भासणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले यंदाचे सोयाबीनचे उत्पादन जपून ठेवावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
राज्यातील सोयाबीनचे क्षेत्र ४१ लाख हेक्टर आहे. त्यातल्या अर्ध्या क्षेत्राला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. बियाण्यासाठी खास राखीव ठेवलेल्या प्रक्षेत्रांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. त्यामुळे पुढील वर्षीच्या हंगामात बियाण्याची कमतरता भासेल. त्यामुे यंदाचे उत्पादन पुढच्या वर्षीच्या सोयाबीन पेरणीसाठी जपून ठेवणे फायद्याचे ठरेल, असे कृषी विभागातील सूत्रांनी सांगितले.
सोयाबीनचे चांगल्या वाणाचे बी एकदा पेरले की सलग २ वर्षे त्याच प्रतीचे पीक येते. एका हेक्टरला साधारण १ क्विंटल बियाणे लागते. राज्याच्या संपूर्ण क्षेत्राचा विचार करता १७३ लाख क्विंटल बियाण्याची गरज आहे. इतके बियाणे थेट बाजारपेठेतून ऐनवेळी उपलब्ध होणार नाही. त्यामुळे आहे ते बियाणे चढ्या भावाने खरेदी करावे लागेल. शेतकऱ्यांनीच यावर उपाय म्हणून यंदाच्या सोयाबीन उत्पादनातील काही टक्के उत्पादन बियाण्यासाठी राखीव ठेवावे, असे कृषी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
उन्हाळी हंगामात बियाण्यासाठी म्हणून सोयाबीनची लागवड करावी. खरीप हंगामात त्याचा उपयोग होईल, असेही सुचवण्यात आले आहे. जिल्हा कृषी अधिक्षक ज्ञानेश्वर बोटे यांनी सांगितले की, सोयाबीनचे बाह्य आवरण पातळ असते. त्यामुळे पोत्यात बी ठेवताना काळजी घ्यावी. त्याला बुरशी लागणार नाही याची दक्षता घ्यावी. आपल्या क्षेत्रानुसार बियाणे शिल्लक ठेवल्यास खर्चात बचत होईल.