राजगुरुनगर : वीजवाहक तारा एकमेकांवर घासून वीजपुरवठा खंडित होणे, ‘शॉर्ट सर्किट’ होणे, तारा तुटून अपघात होणे या दुर्घटना टाळण्यासाठी महाराष्ट्र वीजवितरण कंपनीतर्फे राजगुरुनगर विभागात वीजवाहक तारांना ‘स्पेसर’ बसविण्यात येत आहेत. या उपाययोजनेमुळे अशा दुर्घटनांचे प्रमाण खूपच आटोक्यात येईल, असे राजगुरुनगर विभागाचे उपकार्यकारी अभियंता व्ही. एल. कारंडे यांनी सांगितले. वाढत्या विद्युतीकरणामुळे वीजवाहक तारांचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरलेले आहे. या तारा वाऱ्याने किंवा अन्य काही कारणाने हलल्या, की एकमेकींवर घासून ‘शॉर्ट सर्किट’ होते. अनेक ठिकाणी या तारा एकमेकींना ‘क्रॉस’ करतात. अशा ठिकाणी ‘शॉर्ट सर्किट’ होण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वारंवार घडतात. तारा तुटून अपघातही होतात. या तुटलेल्या तारांतील वीजप्रवाह अन्य माध्यमातून प्रवाहित होऊन अपघात होतात. शेतात अशा घटनांमुळे लोक मृत्युमुखी पडण्याच्या घटनाही घडत असतात.यावर उपाय म्हणून राजगुरुनगर विभागात ‘स्पेसर’ बसविण्यात येत आहेत. हे ‘स्पेसर’ म्हणजे विद्युतरोधक आणि उष्णतारोधक पदार्थाच्या पुंगळ्या आहेत. त्यांच्यावर ऊन, वारा, पाऊस इत्यादींचा परिणाम होत नाही. तारांच्या मध्ये त्या टाकल्यामुळे तारांमधले घर्षण टाळले जाते; परिणामी पुढील अनर्थ टळतो. राजगुरुनगर विभागात चाकण, राजगुरुनगर, तळेगाव, वडगाव आणि लोणावळा हे उपविभाग आहेत. या सर्व उपविभागांत हे काम चालू आहे. पहिल्यांदा शहरातल्या विद्युत वाहिन्यांवर ‘स्पेसर’ बसविले जाणार आहेत. त्यानंतर रस्त्याच्या कडेच्या ‘लाईन’ आणि त्यानंतर शेतांतल्या ‘लाईन’वर हे काम होणार आहे. साधारणपणे ४० ते ५० मीटरच्या अंतराने ते टाकले जात आहेत, असे कारंडे यांनी सांगितले.
अखंड विजेसाठी तारांना ‘स्पेसर’
By admin | Published: September 14, 2016 3:46 AM