धायरी: पुणेकरांकडून वसूल केलेल्या पैशातून काही नेत्यांनी स्वतःसह पक्षाचीही प्रसिध्दी केल्याची असंख्य उदाहरणे आहेत. त्यातच सिंहगड रस्त्यावर आमदार फंडातून केलेल्या बस थांब्याची चर्चा परिसरात जोरदार सुरू आहे. चर्चेचे मुख्य कारण म्हणजे बस थांब्याला दिलेला रंग. हा बसस्टाॅप चक्क भाजपच्या झेंड्याचाच रंगात रंगवला आहे.
सिंहगड रस्त्यावर वीर बाजी पासलकर पुलाजवळ व माणिकबागेतील पेट्रोल पंपासमोर आमदार भीमराव तापकीर यांच्या आमदार फंडातून दोन बस थांबे तयार करण्यात आले आहेत. मात्र ह्या दोन्हीही बस थांब्यांना पक्षाच्या झेंड्याचा रंग दिला असल्याचे केलेल्या पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. नागरीकांच्या पैशांतून मिळणाऱ्या करातून पक्षाची जाहिरात हा काय प्रकार आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. सिंहगड रस्त्यावरील हे बसथांबे चक्क पक्षाचे कार्यालयासारखेच दिसत आहेत.
मनसेचे रवी सहाणे यांनी पुणे शहरात विविध गणेश मंडळे,नागरीक कट्टे पण यांनी सोडले नाही. पक्षाची जाहिरात नागरिकांच्या पैशातून होत आहे. पण नागरिकांना उत्तम रस्ते ,पुरेसे पाणी ,उत्तम आरोग्य मात्र मिळत नसल्याची टीका केली आहे.
याबाबत लोकमत प्रतिनिधीने आ. भिमराव तापकीर यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. बस थांब्यावर कुठेही भाजप पक्षाचे चिन्ह अथवा पदाधिकाऱ्यांचे नाव नाही. वृध्द, अपंग, महिला आदी प्रवाशांना उन्हातान्हात उभे राहावे लागत होते, म्हणून प्रवाशांची सोय व्हावी, या उद्देशाने हे बस थांबे तयार करण्यात आले असल्याचे भाजप खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष सचिन मोरे यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.