पुणे : कोंढवा परिसरात पहाटेच्या सुमारास ग्राहकांच्या वितरणासाठी आणलेले दुध एक रिक्षाचालक चोरुन नेत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या भागातील ७ दुकानांमधून गेल्या ६ महिन्यात तब्बल ५४६ लिटर दुधाच्या पिशव्या या चोरट्याने पळविल्या आहेत.
या प्रकरणी वितरक योगेश लोणकर(रा. कोंढवा) यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. दुध वितरक किराणा दुकानांसमोर ठेवलेल्या क्रेटमध्ये पहाटेच्या सुमारास दररोज ठरल्यानुसार दुधाच्या पिशव्या ठेवून जातात. १३ फेब्रुवारी रोजी या क्रेटमधून १०२ लिटर दुधाच्या पिशव्या गायब झाल्याचे दुकानदारांच्या लक्षात आले. त्यानंतर १२ मार्च रोजी एका दुकानातून ११६ लिटर दुधाच्या पिशव्या चोरीस गेल्या. त्या पाठोपाठ १ एप्रिल रोजी १२४ आणि ७ एप्रिल रोजी ४८ लिटर दुधाच्या पिशव्यांची चोरी झाली. तीन महिन्यांपूर्वीही दोन दुकानांमधून १५६ लिटर दुधाच्या पिशव्यांची चोरी झाल्याचे आढळून आले आहे.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक रिक्षाचालक पहाटे दुधाच्या पिशव्यांची चोरी करीत असल्याचे दिसून आले. तो या पिशव्या इतरत्र विकत असावा अथवा दुध भेसळीच्या रॅकेटमध्ये तो सहभागी असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. कोंढवा पोलीस अधिक तपास करीत आहेत.