पुणे: तुमच्या विरोधात मनी लाँड्रिंगची केस आहे, तुम्हाला सीबीआय चौकशीसाठी यावे लागेल, अशी भीती दाखवून ज्येष्ठाची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी गुरुवारी (दि. ११) लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत रवी कुमार वली (वय ६८, रा.वाघोली) यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक माहितीनुसार, हा प्रकार २८ जून २०२४ रोजी घडला आहे. तक्रारदार यांच्या मोबाइलवर सायबर चोरट्यांनी फोन केला. तुमचे नाव मनी लाँड्रिंगमध्ये आले आहे. तुमच्या नावाचा गैरवापर केला जात असून, त्यासाठी तुमचे आधार कार्ड व बँक खात्याचा वापर करून मनी लाँड्रिंग करण्यात आली आहे, चौकशीसाठी तुम्हाला सीबीआय विभागात यावे लागेल, असे सांगितले. एक लिंक पाठवत तक्रारदारांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर सीबीआय ऑफिसर बोलत असल्याचे, असे सांगून अटकेची भीती दाखविली. तुमच्या बँक खात्याची पडताळणी करायची असून तातडीने खासगी बँकेतील रोकड सरकारी बँकेत जमा करावी लागेल, असे सांगत तक्रारदार यांना ३० लाख रुपये चोरट्यांनी सांगितलेल्या खात्यावर ट्रान्सफर करायला सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने तक्रारदार यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक साळगावकर करत आहेत.