पुणे : शासनाने कायद्यानुसार सन २०२०-२१ या वर्षात शैक्षणिक, सेवा, निवडणूक इतर कारणांकरिता जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य केलेले आहे. या पार्श्वभूमीवर बार्टीच्या वतीने सर्व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना १५ ते ३० मार्च दरम्यान विशेष मोहीम घेऊन अर्ज निकाली काढण्याचे आदेश दिले आहेत.
राज्यात बहुतेक जिल्ह्यात जात पडताळणी समित्यांकडे मोठ्या प्रमाणात अर्ज प्रलंबित आहेत. अनेक वेळेस हेलपाट्याशिवाय एकदा अर्ज निकालीदेखील लागत नाही. यामुळेच ही विशेष मोहीम घेतली आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत समितीकडील ६ महिन्यांवरील सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याच्या व ज्या प्रकरणांत त्रुटी आहेत, त्याबाबत संबंधित विद्यार्थ्यांस व अर्जदारास त्यांच्या प्रकरणांतील त्रुटी पूर्तता करून घेण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत.
ज्या विद्यार्थ्यांना व अर्जदारांना जातवैधता प्रमाणपत्र त्रुटीअभावी प्राप्त झालेले नाही त्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी संबंधित जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी त्रुटी पूर्तता करण्यासाठी आवश्यक पुरावे व मूळ कागदपत्रांसह संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) चे महासंचालक तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे मुख्य समन्वयक धम्मज्योती गजभिये यांनी पत्रकान्वये केले आहे.