पुणे : महसूल प्रशासनाची लोकांमध्ये प्रतिमा सुधारावी व नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रलंबित विषय मार्गी लावावेत, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाने स्वतंत्र आदेश काढले आहेत.
याबाबत अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी सांगितले की, या विशेष मोहिमेअंतर्गत फेरफार अदालतींची प्रभावी अंमलबजावणी करणे, पाणंद रस्ते, शेती रस्ते खुले करणेबाबत मोहीम घेणे, पुनर्वसन वसाहतींना गावठाण, महसुली गावांचा दर्जा देणे व ग्रामपंचायतींची स्थापना करणे, ७/१२ दुरूस्ती व प्रलंबित अहवाल निर्गती करणेबावत विशेष मोहीम घेणे, मेट्रो, रिंगरोड, पालखी महामार्ग, पुरंदर विमानतळ इत्यादी महत्त्वाची भूसंपादनविषयक कामे करणे, माझे संकलन माझी जबाबदारी अंतर्गत, अभिलेख कक्ष अद्ययावतीकरण व प्रलंबित प्रकरणांची निर्गती करणे, दुहेरी अभिलेख पद्धती बंद करणे, आवश्यक त्या ठिकाणी ७/१२ बंद करणे अथवा बंद केलेले ७/१२ सुरू करणे, प्रणालीमध्ये १०० टक्के केसेसची डाटा एन्ट्री करणे, वसुलीचे १०० टक्के उद्दिष्ट साध्य करणेच्या अनुषंगाने वसुली आराखडा तयार करणे, अंमलबजावणी करणे व गाव नमुने, तालुका नमुने व जिल्हा नमुने त्याप्रमाणे अद्ययावत करणे, जमाबंदीबाबत डाॅक्युमेेंटेशन तयार करणे, संजय गांधी शाखेमार्फत राबविल्या जाणाऱ्या केंद्र शासन व राज्य शासन पुरस्कृत वैयक्तिक लाभांच्या योजनांची विशेष मोहीम घेऊन प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.