नीरा : जिल्हाधिकाऱ्यांनी पुणे जिल्ह्यातील ७९, तर पुरंदर तालुक्यातील सात गावे झिका संसर्गाबाबत अतिसंवेदनशील म्हणून जाहीर केली. बेलसरसह या सहा गावांतील नव्याने गर्भधारणा होणाऱ्या गर्भवतींची विशेष काळजी घेण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. यासाठी तालुक्यातील सोनोग्राफी सेंटर चालकांची बैठकही घेण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उज्ज्वला जाधव यांनी ‘लोकमत’ला दिली.
मागील आठवड्यात पुरंदर तालुक्यातील बेलसर गावत झिकाचा जरी एकच रुग्ण सापडला असला, तरी डेंग्यू आणि चिकुणगुनियाचे १०४ रुग्ण गावात आढळले होते. प्रशासनाने केलेल्या तपासणीत इतर कोणाला झिका रोगाची लागण झाली नसल्याचं समोर आले असले, तरी खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य प्रशासन आपली भूमिका बजावत आहे. या १०४ रुग्णांपैकी एखादा पुरुष डेंग्यू आणि चिकुणगुनियाच्या उपचारानंतर बरा झाल्यानंतरही त्या पुरुषामुळे होणारी गर्भधारणा ही झिका रोगाने युक्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच गावकऱ्यांना आरोग्य विभागाकडून आवाहन करण्यात आलं की, शक्यतो तीन-चार महिने गर्भधारणा टाळा किंवा निरोध वापरा.
जगभरातील झिकाबाबतच्या सर्वेक्षणातून असे निदर्शनास आले आहे, की झिकाची लागण झालेली व्यक्तींचा मृत्यूदर नगण्य आहे. पण गर्भातील बाळाला याचा धोका अधिक असतो. नव्याने गर्भधारणा झालेल्या बाळाची पुढची पिढी न्यूरोलॉजिस्ट डिफॉल्ट असतात. प्रतिबंधात्मक कारवाई ही करणे गरजेचे असल्याने सोनोग्राफी (Diagnostic) सेंटर चालकांना तशा सूचन देण्यात आल्या आहेत.
पुरंदर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी सासवड, जेजुरी व नीरा येथील सोनोग्राफी सेंटर चालकांची बैठक घेऊन तालुक्यातील गरोदर मातांची सोनोग्राफी करताना गर्भाचे बारकाईने निरीक्षण करावे. विशेषतः अर्भकाच्या लहान मेंदू अथवा मेंदू व डोक्याच्या भागाची वाढ कशी होते हे पाहावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
झिकाची लागण झाल्यावर रुग्णाला विशेष काही त्रास होत नाही. साध्या पाण्यासोबत पॅरिसिटीमॉलने व घरी आराम केल्याने रुग्ण बरे होतात. पण जर याकाळत गर्भधारणा झालेल्या महिलेला झिकाची लागण झाली तर मात्र पोटातील बाळाच्या मेंदूची वाढ कमी होते. तसेच गर्भपात किंवा ते बाळ पुढे मतिमंद किंवा दिव्यांग होऊ शकते अथवा उपजत मृत्यू होऊ शकतो. अशा मुलांना पुढे कोणतेच औषध नसल्याचे जागतिक आरोग्य यंत्रणेचे म्हणने आहे. जगभरातील डॉक्टरांनी त्यामुळे वेळीच सावधानता बाळगणे गरजेचे असल्याचे केंद्रीय आरोग्य पथकाने सांगितले आहे.
तसेच गरोदर मातेमध्ये झिका संसर्ग झाला तर पहिल्या तिमाहीत गर्भाला संसर्गाची शक्यता 8-15%, दुसऱ्या तिमाहीत -5%, तिसऱ्या तिमाहीत -4% आहे.