पुणे : पुण्यातील गुरुवार पेठेतल्या नाईकवाड्यात४० फुट खोल विहिरीत पडलेल्या श्वानाला सुखरुप वाचवत अग्निशामक दलाने तिच्या ५ पिल्लांना त्यांची आई पुन्हा मिळवून दिली. मंगळवारी (दि. ९) दुपारी बारा वाजता सुमारे अर्धा तास हा थरार गुरुवार पेठेतील नाईकवाड्यात अनेकांनी पाहिला आणि अग्निशामक दलाच्या जवानांचे कौतुक केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाईकवाड्यात ४० फुट खोल विहिरीत एक श्वान पडला असून तिची ५ पिल्ले विहिरीच्या काठावर असल्याची माहिती अग्निशामक दलाला मिळाली. अग्निशमन मुख्यालयातून बचाव पथक रवाना झाले. तिथे घटनास्थळी पोहचल्यावर जवानांनी विहिरीमध्ये सुमारे ४० फूट खोल पाण्यामध्ये श्वानाच्या ओरडण्याचा आवाज ऐकला. लगेचच जवान प्रकाश शेलार यांनी एका मुक्या प्राण्याचा जीव व सोबतच त्या पिल्लांची दशा पाहून दोरीच्या साह्याने खाली विहीरीमधे उतरण्याचे ठरवले. त्यानंतर काहीवेळातच ते चक्क त्या विहिरीमध्ये उतरले. शेलार यांनी त्या पाण्यातील श्वानाच्या जवळ जात भेदरलेल्या श्वानाला दोरीच्या मदतीने योग्य प्रकारे बांधून इतर जवानांना वर ओढण्यास सांगितले व स्वत: शेलार विहिरीतून बाहेर आले. श्वान बाहेर येताच त्या पिल्लांनी त्यांच्या मातेकडे धाव घेत तिला बिलगले. हे मायेचे चित्र पाहून व जवान प्रकाश शेलार यांनी बजावलेल्या तत्परतेचे कौतुक जमलेल्या नागरिकांनी केले.या कामगिरीमध्ये अग्निशमन मुख्यालयातील वाहनचालक नवनाथ मांढरे तसेच जवान प्रकाश कांबळे, शफिक सय्यद, राजेश घडशी यांनी सहकार्य केले.
पुण्यात जवानाचे शर्थीचे प्रयत्न आणि श्वान व तिच्या पिल्लांना जीवदान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 11:47 AM