पुणे : स्वयंसेवी संस्थेत २० वर्षीय विशेष मुलीवर ६० वर्षीय ‘केअर टेकर’ने बलात्कार केला. या प्रकारानंतर पीडितेचे लग्न झाले असल्यामुळे न्यायालयात तिची साक्ष झाली नाही. मात्र, तिने बाळाला जन्म दिला आहे. डीएनए रिपोर्टवरून हे बाळ आरोपीचेच असल्याचे निष्पन्न झाले. हा पुरावा शिक्षेसाठी महत्त्वाचा ठरला. पुराव्यानुसार केअर टेकरला १० वर्षे सक्तमजुरी आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. पी. नांदेडकर यांनी सुनावली. दंड न भरल्यास १५ दिवस अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही आदेशात म्हटले आहे.
श्याम दिवाकर काकडे असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत संस्थेच्या महिला अध्यक्षांनी हवेली पोलिसात फिर्याद दिली आहे. हवेली तालुक्यातील स्वयंसेवी संस्थेमध्ये जून २०१६ आणि त्या पूर्वीचा काही कालावधी आणि २० मार्च २०१७ या कालावधीत ही घटना घडली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील मारुती वाडेकर यांनी काम पाहिले. त्यांनी ७ साक्षीदार तपासले. त्यामध्ये संस्थेच्या महिलाध्यक्षा, विशेष मुलीच्या शाळेचे अध्यक्ष, महिला सामाजिक कार्यकर्त्या, तपासी अंमलदार आणि ससूनच्या डॉक्टरांची साक्ष महत्त्वाची ठरली.
या संस्थेत दोन तरुणींसह नऊ महिला व तीन पुरुष आहेत. त्यापैकी काकडे हा केअर टेकर आहे. पीडितेला कामे सांगून आणि इतर प्रकारे त्याने त्रास दिला. तिच्याशी वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. यातून पीडिता गर्भवती राहिली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. निवृत्त पोलिस निरीक्षक कैलास पिंगळे आणि उपनिरीक्षक आर. के. वाईकर यांनी या प्रकरणाचा तपास केला. जिल्हा कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलिस निरीक्षक आकाश पवार, सत्र न्यायालय कोर्ट पैरवी अंमलदार सहायक पोलिस उपनिरीक्षक विद्याधर निचित, पैरवी कर्मचारी हवालदार सचिन अडसूळ यांनी मदत केली.