पुणे : कोणत्याही विषयाचे संशोधन करताना नीतिमत्तेला विशेष महत्व आहे. विद्यार्थ्यांनी याविषयी अधिक जागरूक व संवेदनशील राहण्याची गरज आहे. तरच त्या संशोधनाला महत्त्व प्राप्त होते, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी व्यक्त केले.
विद्यापीठ अनुदान आयोगाने अनिवार्य केलेला ‘रिसर्च अँड पब्लिकेशन इथिक्स’ हा कोर्स १०० विद्यार्थ्यांनी पूर्ण केला. विद्यापीठात पीएच.डी. साठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स आयोगाने अनिवार्य केला आहे. या कोर्समध्ये तत्वज्ञानाचे स्वरूप त्यातील विविध शाखा, त्यांचे संशोधनाशी संबंध, जगभरातील संशोधनाची मानके, वाङ्मयचौर्य, बनावट प्रकाशने व नियतकालिके व ते ओळखण्यासाठीची साधने, तंत्रे आदींचा समावेश आहे.
करमळकर म्हणाले, की ‘सेंटर फॉर पब्लिकेशन इथिक्स’ या विभागाने या हा कोर्स तयार केला आहे. हा कोर्स सुरु करण्यासाठी सेंटरला अधिकृत मान्यता दिली आहे. या कोर्ससाठी २ श्रेयांक देण्यात आले आहे. या वर्षी १५ जून ते १४ जुलैदरम्यान हा कोर्स विद्यार्थ्यांनी पूर्ण केला.
सेंटरच्या प्रमुख डॉ. शुभदा नगरकर म्हणाल्या, या कोर्सदरम्यान भारतातील विविध विषयात पारंगत असलेल्या तज्ज्ञांना आमंत्रित केले होते. या कोर्ससाठी लागणारे संदर्भ साहित्य ऑनलाईन स्वरूपात ‘मुडल सॉफ्टवेअर’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पोहोचविले.
विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनीही विद्यार्थ्यांनी उत्तम संशोधन करावे असा सल्ला दिला. डॉ. भाऊसाहेब पानगे, प्रा. एमेरिटस यांनीही मार्गदर्शन केले.