पुणे : रंग बरसे भिगे चुनरवाली रंग बरसे, सूनो जोर से दुनिया वालो बुरी नजर ना हमपे डालो, सबसे आगे होंगे हिंदुस्तानी, आँख मारे ओ लडकी आँख मारे, झिंग झिंग झिंगाट, अशा हिंदी मराठी गाण्यांच्या तालावर, कोरडे रंग व फुलांची उधळण करत विशेष मुलांनी रंगबरसेचा आनंद लुटला. भोई प्रतिष्ठानतर्फे धुलिवंदननिमित्त विशेष मुलांसाठी रंगबरसे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भोई प्रतिष्ठानचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. विशेष मुलांच्या एकलव्य न्यास, स्वाधार संस्था, लुई ब्रेल अंध अपंग संस्था, महावीर निवासी मतिमंद संस्था, दीप ग्लोबल सोसायटी, दिशा इन्स्टिट्यूट, सेवाधाम वृद्धाश्रम, सूर्योदय सोशल फाऊंडेशन, जिजाऊ फाऊंडेशन, वंचित विकास संस्था, ज्ञानगंगोत्री मतिमंद विद्यालय, सहेली फाऊंडेशन, समर्पण संस्था आदी संस्था आणि विद्यालयाची मुले सहभागी झाली होती. अग्निशमन यंत्रणेच्या पाण्याच्या फवाऱ्याचा मुले आनंद घेत होती. लाल, पिवळ्या, निळ्या, हिरव्या, जांभळ्या अशा कोरड्या रंगानी उधळण मुले करत होती. लहान मुलांपासून ज्येष्ठ लोकांपर्यंत सर्व रंगबरसेत सहभागी झाले होते. विशेष मुलांच्या पालकांनीसुद्धा रंग आणि पाणी खेळून आनंद लुटला. उन्हाळा असून कुठलाही विचार न करता सर्व खेळण्यात दंग झाले होते. डीजेच्या हिंदी, मराठी गाण्यांवर रंग खेळण्याबरोबरच डान्स करण्यात मग्न झाले होते. कार्यक्रमात सेल्फी काढणे, एकमेकांना रंग लावणे, लहान मुलांचे ते पिचकाऱ्यांनी पाणी उडवणे यामुळे कलरफुल वातावरण झाले होते. भोई प्रतिष्ठानच्या वतीने मुलांसाठी नाष्टा व स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. तर मुस्लिम समाजाकडून मुलांसाठी दूध वाटप करण्यात आले. कार्यक्रमात महापौर मुक्ता टिळक, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर, महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, बालविकास मंत्रालयाचे सहसचिव लालसिंग गुजर, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे, सहआयुक्त अनिल गुंजाळ, सप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप शेठ, नगरसेवक रवींद्र धंगेकर आदी उपस्थित होते. ..........................................
रंगबरसे कार्यक्रमात अनेक संस्था आणि विद्यालयांचे १२०० विशेष मुले सहभागी झाले आहेत. समाजात असे अनेक उपक्रम राबवणे गरजेचे आहे. याठिकाणी मुलांबरोबर बाबासाहेब पुरंदरे, नितीन करमळकर असे प्रत्येक क्षेत्रातील लोक सहभागी झाले आहेत. माझ्याकडून सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा.....! मिलिंद भोई भोई प्रतिष्ठान अध्यक्ष.