पुणे : घटना दुरुस्तीसाठी महाराष्ट्रसाहित्य परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा शनिवारी (दि.२८) नवी पेठेतील पत्रकार भवन येथे दुपारी दोन वाजता आयोजित करण्यात आली आहे. परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सभेमध्ये संस्थेचे मानद अध्यक्षपद विसर्जित करून कार्याध्यक्ष हेच अध्यक्ष हा ठराव मांडण्यात येणार आहे.
या घटनादुरुस्तीला मान्यता मिळाल्यास कार्याध्यक्ष पदाचा कार्यभार अध्यक्षांकडे वर्ग होईल तसेच पुढील काळात अध्यक्षपदासाठी निवडणूक होईल. प्रस्तावित घटनेमध्ये पदाधिकाऱ्यांची पूर्वीच्या संख्येत वाढ होणार आहे. अध्यक्ष, तीनऐवजी चार उपाध्यक्ष, एक कोषाध्यक्ष, एक प्रमुख कार्यवाह, सात कार्यवाह, दोन स्वीकृत सदस्य, दोन विभागीय कार्यवाह आणि मसाप साहित्य पत्रिकेचे संपादक अशी प्रस्तावित पदाधिकारी संख्या आहे. प्रस्तावित घटना दुरूस्तीची प्रत www.sahityaparishad.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यावर आलेल्या हरकती आणि सूचना यांवर चर्चा करण्यात येणार आहे. शनिवारी सकाळी कार्यकारी मंडळाची बैठक होणार असून, त्यानंतर सर्वसाधारण सभा होणार आहे, अशी माहिती परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.