पुणे : भूसंपादनाच्या नवीन विधेयकाच्या पार्श्वभूमीवर जागा मालकांनी विशेष पॅकेज देण्याची मागणी केली आहे. भूसंपादनाचे काम रखडल्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून पुणे-नाशिक महामार्गाचे काम संथगतीने सुरू आहे. याबाबत १५ मे नंतर प्रत्येक गावांमध्ये शिबिर घेऊन नागरिकांना भूसंपादनाचे पैसे वाटप करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले.पुणे-नाशिक महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. यात नाशिक जिल्ह्यात रस्त्याचे रुदीकरणाचे बहुतेक काम पूर्ण होत आले आहे. परंतु, पुणे जिल्ह्यात रस्त्यांसाठी करण्यात येणाऱ्या भूसंपादनाला विरोध होत आहे. यामध्ये आळेफाटा, नारायणगाव, मंचर आणि राजगुरुनगर येथे नागरिकांनी रस्त्यासाठी जागा देण्यास विरोध केला आहे. तसेच नारायणगाव, राजगुरुनगर येथे बायपास करण्यात येणार असून, याला देखील नागरिकांचा विरोध आहे. सध्या पुणे जिल्ह्यातील ३२ किलोमीटरचे भूसंपादन रखडले आहे. या ३२ किलोमीटरमध्ये १२ गावे येत असून, यापैकी सुमारे ११ गावांमध्ये भूसंपादनाची प्रक्रिया सुरु आहे. हे भूसंपादन करण्यासाठी एनएचआय विभागाने सुमारे २४ कोटी निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिला आहे. यापैकी भूसंपादन विभागाने आतापर्यंत केवळ सहा कोटी रुपयांचे वाटप जागा मालकांना केले. त्यामुळे आता शिल्लक असलेल्या पैशाचे वाटप करण्यासाठी १४ मे ते १० जून दरम्यान प्रत्येक गावांमध्ये खास शिबिराचे आयोजन करुन पैशाचे वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर भूसंपादनाच्या कामाला वेग येईल, असे राव यांनी स्पष्ट केले. (वार्ताहर)
महामार्गाच्या भूसंपादनासाठी विशेष पॅकेजची मागणी
By admin | Published: May 10, 2015 4:56 AM