लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : लोणावळा येथे महिनाभरापूर्वी झालेल्या तरुण-तरुणीच्या खुनाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. या खुनाविषयी माहिती देणाऱ्यास ५० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात येत असल्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.२ ते ३ एप्रिलदरम्यान भुशी धरणाजवळ अभियांत्रिकी शाखेत शिकणाऱ्या तरुण-तरुणीचा मृतदेह आढळला होता. महिना उलटूनही या खुनाचा तपास लागलेला नाही. हक म्हणाले, ‘‘या घटनेतील युवकाच्या डोक्याच्या मागे कठीण वस्तूने प्रहार झाल्याचे आणि युवतीच्या हनुवटीवर दगडाने मारल्याचे शवविच्छेदन अहवालात दिसून आले आहे. डीएनए तपासणीचा अंतिम अहवाल येत्या आठवड्यात प्राप्त होईल.’’ या घटनेमागील धागेदोरे अद्याप हाती आलेले नसल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार विशेष तपास पथक स्थापन करण्यात येत आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, लोणावळा शहर व लोणावळा ग्रामीण, ३ खासगी सायबर तज्ज्ञ, अशा गुन्हयांंचा तपास करण्यात तज्ज्ञ असलेले, सध्या बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये नियुक्त असलेले अधिकारी अशा ५० जणांचा समावेश या पथकामध्ये असेल. या पथकासाठी लोणावळा किंवा खंडाळा येथे खास कार्यालयही निर्माण करण्यात येणार असून आपण स्वत: या पथकावर देखरेख व नियंत्रण करणार आहोत. या खुनाविषयी कोणाला काही माहिती असल्यास ती ग्रामीण पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती द्यावी.
लोणावळ्याच्या दुहेरी हत्येच्या तपासासाठी विशेष पथक
By admin | Published: May 07, 2017 2:38 AM