पुणे : शहरामध्ये ठिकठिकाणी कचरा जाळण्याचे प्रकार वाढत असल्याचा अहवाल ‘परिसर’ या संस्थेने महापालिकेला दिला होता. त्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिध्द केले. त्यानंतर महापालिकेने आता शहरात कुठेही कचरा जाळत असतील, तर त्यावर कारवाई करण्यासाठी ‘स्पेशल स्क्वॉड’ तयार केला आहे. नागरिकांनी त्यांना संपर्क केल्यास त्वरीत घटनास्थळी जाऊन ते कारवाई करणार आहेत.
कचरा जाळल्याने प्रदूषणात वाढ होत आहे. शहरातील वाढलेली वाहनांची संख्या, बांधकामे यामुळे प्रदूषणात भर पडत आहे. त्यात कचरा जाळला जातो. परिणामी त्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. याविषयी ‘परिसर’संस्थेने सर्वेक्षण करून महापालिकेच्या परिसरात सर्रास कचरा जाळत असल्याचे समोर आणले होते. रस्त्यालगत कचरा साठून ठेवला की, त्याचे काय करायचे ? म्हणून तो जाळला जातो. त्यामध्ये प्लास्टिकच्या पिशव्याही असतात. परिणामी कार्बन डॉयऑक्साइड व इतर विषारी वायू वातावरणात जातात. म्हणून कचरा जाळू नये यासाठी परिसर संस्था काम करत आहे.
महापालिकेने वॉर्डनिहाय स्पेशल स्क्वॉडची नियुक्ती केली आहे. दोन किंवा तीन शिफ्टमध्ये हे लोक काम करतील. याविषयी भोसले नगरमध्ये नुकतेच काहीजण पानांचा ढिग करून तो जाळत होते. तेव्हा एका नागरिकाने महापालिकेला फोन केला. तेव्हा तत्काळी त्याची दखल घेऊन घटनास्थळी हे स्क्वॉड पोचले. त्यांनी नागरिकांना समज देखील दिली, अशी माहिती ‘परिसर’च्या शर्मिला देव यांनी दिली.
दरम्यान, कोंढवा परिसरात नागरिकांनी फोन केल्यास त्यांना प्रतिसाद मिळाला नाही, अशीही घटना समोर आली. याविषयी नागरिकांनी संबंधित वॉर्ड ऑफिसमध्ये संपर्क साधून त्याची नोंद करायल लावावी, असे आवाहन देव यांनी केले.
राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने (एनजीटी) गेल्यावर्षी कचरा जाळण्याच्या प्रकाराबद्दल सूचना दिल्या होत्या. त्यामध्ये महापालिकेला सांगितले होते की, प्रत्येक महिन्याला वॉर्डनिहाय किती तक्रारी आल्या आणि त्या किती सोडविल्या याविषयीचा अहवाल संकेतस्थळावर अपलोड करावा. परंतु, महापालिकेच्या वतीने तसे अजून तरी काही होत नाही. - पुष्कर कुलकर्णी, पुणे एअर ॲक्शन हब
पुणे महापालिकेची तयारी
१) १५ वॉर्डनिहाय स्क्वॉड
२) स्क्वॉडमध्ये दोन ते तीन व्यक्ती
३) तीन शिफ्टमध्ये काम