पुणे : अंथरुणांना खिळलेल्या व शारीरिक हालचाल करता न येणाऱ्या व्यक्तींसाठी, पुणे महापालिकेकडून संबंधित व्यक्तींच्या घरी जाऊन कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे़ याकरिता स्वयंसेवी संस्थांच्या मार्फत अशा व्यक्तींची माहिती गोळा करण्यात येणार असून, संबंधित व्यक्तीच्या नातलगांच्या परवानगीने त्यांना घरी जाऊन लवकरच लस दिली जाणार आहे़
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, पुणे शहरात अंथरुणांना खिळलेल्या व शारीरिक हालचाल करता न येणाऱ्या व्यक्तींचे राज्य शासनाच्या आदेशानुसार लसीकरण करण्यात येणार आहे़ ज्या व्यक्ती स्वत:हून लसीकरण केंद्रावर येऊ शकत नाहीत, अन्य आजारांनी व वयोमानामुळे शारीरिक हालचाल करू शकत नाही, अशा व्यक्तींना कोरोनापासून बचाव करण्यासाठी त्यांच्या जीविताला महत्त्व देऊन ही विशेष लसीकरण मोहीम सुरू करण्यात येणार आहे़
या मोहिमेत लसीकरण झाल्यावर संबंधित व्यक्तीच्या घरी अर्धा तास डॉक्टर अथवा नर्स त्यांच्या निगराणीखाली प्रकृतीत काही बदल होत नाही यासाठी थांबणार आहेत़ त्यामुळे यात मोठा वेळ जाणार असला तरी दिवसाकाठी शहरातील अंथरूणांना खिळलेल्या व शारिरिक हालचाल न होणाऱ्या किमान ५० व्यक्तींचे लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे़
नातेवाईकांची परवानगी आवश्यक
दरम्यान या व्यक्तींच्या लसीकरणासाठी, संबंधिताची शारिरिक हालचाल होऊ शकत नाही याबाबत डॉक्टरांचे सर्टिफिकेट, ती व्यक्ती लस घेण्यास सक्षम आहे की नाही याचा दाखला व त्या व्यक्तींच्या नातेवाईकांची परवानगी आवश्यक राहणार आहे़ स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून अशा व्यक्तींची माहिती घेतानाच, अशा व्यक्तींच्या नातेवाईकांनीही या लसीकरणासाठी महापालिकेला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे़ लवकरच याबाबतची माहिती सादर करण्यासाठी ई-मेल आयडीही जाहीर केला जाणार आहे.