पुणे : कोरोना संकट चोहोबाजूनी आक्रमण करत असतानाच स्वतःचा जीव धोक्यात घालून सामाजिक बांधिलकी आणि कर्तव्य श्रेष्ठ मानत अनेक 'कोरोना वॉरियर्स' काम करत आहे. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे. याच भावनेतून सिनेमा व नाट्य क्षेत्रातील काही कलाकार मंडळींनी पुण्यात पोलिसांचा सन्मान केला. यावेळी त्यांनी नागरिकांना या कोरोना वॉरियर्सला सहकार्य करण्याचे आवाहन देखील केले.
पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील वडगाव पुल येथे मराठी कलाकारांनी एकत्र येत पोलिसांना गुलाबपुष्प आणि सुरक्षा कीट प्रदान करत त्यांचं कौतुक केले. तसेच रस्त्यावर ये-जा करणाऱ्या नागरिकांची देखील फलकाद्वारे कोरोनाबाबत जनजागृती देखील केली. या उपक्रमांत यावेळी ज्येष्ठ अभिनेते व निवेदक राहुल सोलापूरकर, अभिनेते आनंद इंगळे, अभिनेत्री अक्षदा देवधर, मृण्मयी देशपांडे, संस्कृती बालगुडे अभिनेता अमेय वाघ, स्वप्निल वाघ यांसह विविध कलाकार सहभागी झाले होते.
कोरोना काळात महाराष्ट्राचं संपूर्ण पोलीस दल रस्त्यावर उतरून कोरोनाला हरविण्यासाठी जीवाची पर्वा न करता कर्तव्ये बजावत आहे. त्यांच्याप्रती असलेला आदर व्यक्त करण्यासाठी आणि त्यांचं मनोबल वाढविण्यासाठी ही मराठी कलाकार मंडळी बुधवारी (दि.२८) रस्त्यावर उतरले होते. यावेळी त्यांनी पोलिसांचा सन्मान करत त्यांना सहकार्य करा अशी हात जोडून विनवणी देखील केली.
अभिनेत्री अक्षया देवधर म्हणाली, कोरोना काळात स्वतःसह कुटुंबाची देखील पर्वा न करता पोलीस दल काम करत आहे.त्यामुळे त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे याच भावनेतून आम्ही हा प्रयत्न केला आहे. परंतु, या परिस्थितीत विनाकारण घराबाहेर पडू नका.आणि जर घराबाहेर पडणाऱ्यांना पोलिसांनी काही प्रश्न विचारले तर त्यांना सहकार्य करा. ते आपल्या काळजीसाठीच कर्तव्य बजावत आहे.
अभिनेता अमेय वाघ म्हणाला, आमच्या आधीच्या पिढीतील माणसांनी वेगवेगळ्या प्रकारची संकटे पाहिली होती. मात्र, कोरोना हे आमच्या पिढीने आत्तापर्यंत पाहिलेलं सर्वात मोठं संकट आहे. पण या संकटात देखील राज्याचं संपूर्ण पोलीस दल ज्या हिरीरीने सर्वच पातळ्यांवर अहोरात्र लढा देत आहे ही बाब नक्कीच कौतुकास्पद आहे. आज आम्ही फक्त कलाकारांचे प्रतिनिधी म्हणून नाही तर महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या वतीने पोलिसांविषयी आदर व्यक्त करण्याकरिता एकत्र जमलो आहोत.