लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : भारतात कोरोनाची दुसरी लाट येऊन धडकली आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेचा वेग अधिक आहे. अद्याप देशात अंदाजे ४ टक्के लोकांनाच कोरोनाची लागण झाली आहे. दुसऱ्या लाटेचा आलेख कसा असेल, याबाबत अद्याप अनिश्चिता आहे. कारण, सौैम्य विषाणू जास्त वेगाने पसरतो. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत राज्यात दररोजच्या कोरोनाग्रस्तांचा आकडा ५०,००० पर्यंत जाऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
तीन-चार महिन्यांचा दिलासा मिळाल्यानंतर फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढायला सुरुवात झाली. गुरुवारी (१८ मार्च) राज्यातील दैैनंदिन कोरोना आकडेवारीने आजवरचा उच्चांक गाठला. राज्यात एका दिवशी २५,८३३ कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली. यापूर्वी, सप्टेंबरमध्ये सर्वाधिक २४,८९६ रुग्णांची नोंद झाली होती. सध्याची वाढती रुग्णसंख्या ही कोरोनाच्या दुस-या लाटेची सुरुवात आहे आणि ही लाट वेगवान आहे, असे भाष्य नुकतेच एम्सचे अध्यक्ष डॉ. रणदीप गुलेरिया यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी साधलेल्या संवादात दुस-या लाटेबाबत उच्चार केला होता.
आयएमचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, ‘सध्याच्या लाटेचा वेग प्रचंड आहे. पहिली लाट कायम दुसऱ्या लाटेपेक्षा वेगवान असते. सध्या ९० टक्के लोक सौैम्य लक्षणे असलेले किंवा लक्षणेविरहित आहेत. सध्या होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांमध्ये अजिबात गांभीर्य पहायला मिळत नाही. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अजून गांभीर्याने घेण्यात आलेले नाही. केंद्रीय आरोग्य सचिवांनी एका कोरोनाग्रस्त व्यक्तीमागे २०-३० जणांचे ट्रेसिंग व्हावे, असे सांगितले असताना आपल्याकडे अजून ६-८ एवढेच ट्रेसिंग होत आहे.’ ‘बॉम्बे नर्सिंग अॅक्टअंतर्गत पुण्यात सुमारे ६०० रुग्णालये आहेत. त्यापैैकी ४०-४५ रुग्णालयांमध्येच लसीकरण सुरु आहे. लसीकरणाचा वेग आणि केंद्रांची संख्या २० पटींनी वाढवण्याची गरज आहे. किमान ७० टक्के लोकांचे लसीकरण जूनपर्यंत पूर्ण व्हायला हवे, असे उद्दिष्ट ठेवून काम केले पाहिजे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
-----------------------
मागील वर्षी मार्चमध्ये कोरोनाच्या साथीला सुरुवात झाली. सप्टेंबरच्या मध्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येने परमोच्च बिंदू गाठला. म्हणजेच, साथीचा उच्चांक गाठायला सहा महिने लागले. नोव्हेंबरपासून रुग्णवाढीचा आलेख खाली आला. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून रुग्ण काहीशा वेगाने वाढायला सुरुवात झाली. मार्चच्या दुस-या आठवड्यापर्यंत रुग्णसंख्येने नवा उच्चांक गाठला आहे. याचाच अर्थ पहिली लाट सहा महिन्यांत उच्चांकापर्यंत पोचली, तर दुसरी लाट दीड महिन्यात आजवरच्या सर्वोच्च बिंदूपर्यंत पोहोचली आहे. लाट अशीच वाढत राहिल्यास एप्रिलच्या मध्यापर्यंत राज्यातील दैैनंदिन आकडेवारी ५०,००० चा टप्पा गाठू शकते.
- डॉ. अविनाश भोंडवे, माजी अध्यक्ष, आयएमए
------------------------
दुसरी लाट भयानक वेगाने पसरत आहे. विषाणू सौैम्य होतो, तेव्हा तो वेगाने पसरतो. ७० कोटी लोकांना लागण झाल्याशिवाय साथ जाणार नाही. सध्या एक-दीड कोटी लोकांना लागण होऊन गेल्याची नोंद आहे. त्यापेक्षा ३० पट लोकांना प्रत्यक्ष संसर्ग झालेला असू शकतो, असा अंदाज बांधला जात आहे. ३० कोटी लोकांना लागण होऊन गेली, असे गृहित धरले तरी साथ अजून खूप काळ चालणार आहे. अशा वेळी लसीकरणाचा वेग वाढवणे हाच उपाय आहे. आता लॉकडाऊन हा पर्याय असू शकत नाही.
- डॉ. अनंत फडके, सहसमन्वयक, जनआरोग्य अभियान