प्रवाशांना झटके बसणार नाही, ३० किमीने गती वाढणार
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : लोणावळा-दौंड रेल्वे मार्गावर थिकवेब स्विच बसविले जाणार आहे. त्यामुळे पुणे रेल्वे स्थानकावरून धावणाऱ्या गाडीच्या गतीमध्ये वाढ होणार आहे. आता प्रतितास ११० किमी रेल्वे धावते, ती आता १४० प्रतीतास धावणार आहे. सध्या मुंबई- भुसावळ रेल्वे मार्गावर याचे काम सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यात पुणे विभागात हे काम केले जाईल. लोणावळा-दौंड रेल्वे मार्गावर जवळपास १३० थिकवेब स्विच बसविले जाईल. सुरुवातीला मेन लाईननंतर मात्र काही ठिकाणी लूप लाईनवर देखील बसविले जाणार आहे.
रेल्वे बोर्डने सुवर्ण चतुष्कोन मार्गावर धावणाऱ्या गाड्याच्या गतीत वाढ करण्यासाठी हा निर्णय घेतला. पुणे रेल्वे स्थानक हे मुंबई-चेन्नई ह्या सुवर्ण चतुष्कोन मार्गावरील महत्त्वाचे स्थानक आहे. त्यामुळेच लोणावळा-दौड रेल्वे मार्गावर हे थिकवेब स्विच बसविण्याचा निर्णय घेतला.
देशात पहिल्यादाच अशा प्रकारच्या स्वीचचा वापर केला जात आहे. गाडीची गती वाढण्यासोबतच प्रवाशांना आता टर्न आउटवरून गाडी रुळ बदलताना जे झटके बसतात, ते झटके देखील बसणार नाही.
---------------
थिकवेबची वैशिष्ट्य काय :
1. गाड्यांची गती प्रतितास ११० किमीवरून १४० किमी होईल.
2. रुळांची मजबुती वाढेल. त्यामुळे जास्त वजनाच्या मालगाड्या देखील सहज धावू शकतील.
3. सामान्य स्विचच्या तुलनेत अधिक सुरक्षित.
4. सामान्य स्विचच्या तुलनेत तीनपट अधिक आयुर्मान.
5.प्रवासा दरम्यान झटके बसणार नाहीत.
एक स्विच बसविण्यासाठी :
एक थिकवेब स्विच बसविण्यासाठी तीन तासांचा ब्लॉक घ्यावा लागतो. यासाठी ३० ते ४० कर्मचाऱ्यांची आवश्यकता लागते. हे स्विच पुणे-लोणावळा, पुणे-दौंड व दौंड-मनमाड सेक्शनमध्ये बसविले जाणार आहे. परिचालन, सिग्नल आणि टेलिकम्युनिकेशन, इंजिनिअरिंग व विद्युत विभागाच्या वतीने केले जाईल.
थिकवेब स्विच म्हणजे काय -
स्थानकातून रेल्वे बाहेर पडताना किंवा स्थानकात येताना रूळ बदलते. रूळ बदलाच्या ठिकाणी स्विच असतात. थिकवेब हे त्या स्विच प्रगत असा प्रकार आहे. जो अधिक शक्तिशाली, अधिक कंपन सहन करणारा आहे.
कोट
थिकवेब स्विचमुळे गाड्यांची गती निश्चितच वाढणार आहे. पुणे विभागात लवकरच स्विच बसविण्याचे काम सुरू होईल.
- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, पुणे