पुणे : जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था अधिक जलद, सुरक्षित होण्याकरिता आवश्यक ती सर्व कार्यवाही गतीने करण्याच्या सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी जिल्हा प्रशासनासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांना दिल्या. जिल्ह्यातील हायब्रीड अॅन्युइटी अंतर्गत ९ रस्त्यांच्या ५ पॅकेजच्या सुमारे २ हजार कि.मी. लांबीच्या व ६ हजार कोटी रकमेच्या रस्त्यांच्या कामांचा आढावा बापट यांनी घेतला.या बैठकीला जिल्हाधिकारी सौरभ राव, अधीक्षक अभियंता राजेंद्र रहाणे, कार्यकारी अभियंता धनंजय देशपांडे, मिलिंद बारभाई, भरतकुमार बाविस्कर, सी. टी. नाईक यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अन्य अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील हायब्रीड अॅन्युइटी अंतर्गत ९ रस्त्यांच्या ५ पॅकेजचे काम सुरू आहे. त्यामध्ये अष्टविनायक पॅकेजचे २७० किमी, बेल्हे - पाबळ -शिक्रापूर - उरुळी कांचन - जेजुरी -मोरगाव - बारामती - नीरा नृसिंहपूरच्या १७० किलोमीटरच्या कामांचा समावेश आहे. यासोबतच पुणे - शिरूर हा ५५ किमी रस्ता सहा पदरी करण्यात येणार असून वाघोली, लोणीकंद, कोरेगाव भीमा आणि शिक्रापूर येथे ४ उड्डाणपूल बांधण्यात येणार आहेत. हे रस्ते टोलमुक्त असणार आहेत. याशिवाय एमआयडीसी हिंजेवाडी - चाकण -शिक्रापूर - तळेगाव या भागातील रस्त्यांची सुधारणा करणे, पर्यटनस्थळे राजमाची, लोणावळा, पवना, पानशेत, खडकवासला, सिंहगड, तोरणा, पुरंदर आदी ठिकाणे जोडणाºया १५० किमी लांबीच्या रस्त्यांचा अंतर्भाव पॅकेजमध्ये असल्याची माहिती या वेळी देण्यात आली. पाच पॅकेजपैकी दोन पॅकेजच्या कामांच्या निविदा प्रसिद्ध झाल्या असून, ३ निविदा सप्टेंबरअखेर प्रसिद्ध होतील, अशी माहिती अधीक्षक अभियंता राजेंद्र रहाणे यांनीदिली. पालकमंत्री बापट यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, ससून हॉस्पिटल, औंध शासकीय रुग्णालय आदींच्या बांधकामाच्या प्रगतीचीही माहिती घेतली.‘लोकराज्य’चे प्रकाशन1 शासनाचे मुखपत्र असलेल्या ‘लोकराज्य’ या मासिकाच्या ‘आपले जिल्हे विकासाची केंद्रे’ या विशेषांकाचे प्रकाशन पालक मंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते विधानभवन येथे झाले. या वेळी खा. सुप्रिया सुळे, आ.दत्तात्रय भरणे, जिल्हाधिकारी सौरभ राव, विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक मोहन राठोड, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, तसेच संग्राम इंगळे व रोहित साबळे उपस्थित होते.2विशेषांक स्पर्धा परीक्षा देणारे उमेदवार, पत्रकार, अभ्यासक, शिक्षक, सर्वसामान्य नागरिक व विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल, असे सांगत बापट यांनी शुभेच्छा दिल्या. सप्टेंबर महिन्यातील या विशेषांकामध्ये पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी लिहिलेल्या ‘सुबक आणि सुंदर’ या शीर्षकाचा जिल्ह्यातील विकास कामांवरील आधारित लेखांचा समावेश आहे.नेहरू युवा केंद्राद्वारे स्वच्छ भारत अभियान ग्रामस्वच्छता, पर्यावरण इत्यादी क्षेत्रात कार्य करणाºया संस्था, युवा मंडळे, स्वयंसेवी संस्था व सामाजिक समूह यांच्याद्वारे स्वच्छ भारत अभियानाबाबत, तसेच जलयुक्त शिवार व हागणदारीमुक्त शहर, तालुका, गाव व समुदाय इत्यादीसाठी पुरस्कार देण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप प्रथम पुरस्कार ८ हजार रुपये व मानपत्र तसेच द्वितीय पुरस्कार ४ हजार रुपये व मानपत्र असे २०१५-१६ या वर्षांकरिता पुणे जिल्ह्यात एकूण प्रथम क्रमांकाचे १३ पुरस्कार व द्वितीय क्रमांकाचे १३ पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा युवा समन्वयक यशवंत मानखेडकर यांनी दिली आहे.
वाहतूक व्यवस्था गतिमान करा - गिरीश बापट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 3:28 AM