पुणे :औंध जिल्हा रुग्णालय व उराे रुग्णालय हे सार्वजनिक खासगी भागीदारी म्हणजेच ‘पीपीपी माॅडेल’ द्वारे खासगीकरण करण्यावर शिक्कामाेर्तब झाले आहे. राज्य शासनाचे अवर सचिव अ. भि. माेरे यांनी हाॅस्पिटलची माहीती आराेग्य आयुक्त धीरज कुमार यांच्याकडे एका पत्राद्वारे मागितली आहे.
आराेग्यमंत्री तानाजी सावंत यांनी औंध जिल्हा रुग्णालयाचे बहुराष्ट्रीय कंपन्यांची मदत घेउन ‘पीपीपी माॅडेल’ राबवण्याचे याआधीच स्पष्ट केले आहे. परंतू, याबाबत पुरेशी स्पष्टता नसल्याने ही बाब खासगीकरणाच्या पथ्यावर पडणार असल्याचे दिसून येत आहे. याबाबत आराेग्यमंत्यांनी काही महिन्यांपूर्वी मंत्रालयात बैठक घेतली हाेती. याबाबत ‘लाेकमत’ ने सर्वप्रथम आवाज उठवला हाेता.
आता या प्रकरणाला वेग आला आहे. अव्वर सचविवांनी ८ ऑगस्ट राेजी दिलेल्या पत्रात जिल्हा रुग्णालय व उराे रुग्णालयाची एकुण जागा किती आहे, त्याचे क्षेत्रफळ किती आहे तसेच त्याचा सव्र्हे नंबर किती आहे ही माहीती मागितली आहे. तसेच या जागेत इतर संस्थांच्या इमारतीने एकुण किती जागा व्यापली आहे किंवा किती क्षेत्र वापरात आहे याबाबतही माहीती मागवली आहे. याचबराेबर औंध जिल्हा रुग्णालयाच्या जागेवर किती अतिक्रमन झाले आहे, या जागेवरील इमारती व अतिक्रमण क्षेत्र वगळता किती माेकळी जागा शिल्लक आहे तसेच या रुग्णालयाच्या ८५ एकर जागेचा नकाशा असल्यास ताे उपलब्ध करून दयावा, असेही या पत्रात म्हटले आहे.
वीस हजार काेटींचा प्रकल्पऔंध हाॅस्पिटलचे पीपीपी माॅडेलबाबत आराेग्यमंत्री सावंत यांनी पुण्यात व पंढरपुर येथे बाेलताना स्पष्ट केले हाेते की औंध जिल्हा रुग्णालयाची ८५ एकर जागा आहे. त्या जागेत पीपीपी मॉडेलद्वारे १५०० बेडचे हाॅस्पिटल, ३०० बेडचे मेंटल हाॅस्पिटल, ३०० बेडचे कॅन्सर हाॅस्पिटल, नर्सिंग काॅलेज, दोन हजार नातेवाइकांसाठी निवास बांधण्यात येणार आहे. हा प्रकल्प शासन चालवणार असून सर्व सेवा माेफत असणार आहेत. हा १५ ते २० हजार कोटींचा प्रकल्प असून, टाटा, एल ॲंड टी अशा कंपन्यांना हे काम दिले जाईल. हे सर्व केंद्र शासनाच्या नियमानुसार हाेईल. कंपन्यांनी या प्रकल्पासाठी पैसा लावल्यावर त्यांना येथील जमीनीचा काही भाग २० टक्के नफा हाेईल अशा पध्दतीने विकसित करण्यासाठी दिला जाईल.