लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मेट्रो लाईन ३ हिंजवडी ते शिवाजीनगर करता आवश्यक असलेली राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेची (एनसीएल) जागा अखेर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)च्या ताब्यात मिळाली आहे. यामुळे पीएमआरडीएच्या मेट्रोच्या कामाला आता गती मिळणार आहे.
मेट्रो लाईन ३ हिंजवडी ते शिवाजीनगर करिता एकूण ७२३५.५६ चौ. मी. क्षेत्राचा ताबा एनसीएलकडून पीएमआरडीए यांना व त्यांच्याकडून टाटा अर्बन ट्रान्सपोर्ट प्रा. लि. यांना प्रत्यक्ष कामकाज करण्यासाठी हस्तांतरित करण्यात आला. या जागेचा वापर मेट्रोचे वाहनतळ व जिना उतरण्यासाठी करण्यात येणार आहे. याकरिता पीएमआरडीएकडून जवळपास २.७५ कोटी रुपये एनसीएलला देण्यात आले.
पुणे मेट्रो लाईन ३ हा महत्त्वाचा प्रकल्प असून सदर प्रकल्प वेळेत पूर्ण करणे आवश्यक असल्याने या जमिनीचा प्रत्यक्ष ताबा तत्काळ देण्यासाठी केंद्र सरकारची मान्यता मिळाली आहे. त्यास अनुसरून २५ मार्च २०२१ रोजी सदर हस्तांतरण पूर्ण करण्यात आले. ही जागा ताब्यात आल्याने मेट्रो लाईन ३ च्या भूसंपादन प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा पीएमआरडीएने गाठला आहे.